जालना – अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने बुधवारी जालना शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. ‘देवेन्द्र फडणवीस आणि भाजप सरकारला त्यांनी दिलेल्या शब्दासाठी हा महामोर्चा’ असल्याचा उल्लेख सभास्थानी असलेल्या व्यासपीठावरील फलकावर होता.
दीपक बोहाडे यांनी या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा बुधवारी आठवा दिवस होता. शहरातील गांधी चौकातून उपोषण स्थळी पोहोचल्यावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी बोऱ्हाडे वगळता कुणाचेही भाषण झाले नाही. यावेळी त्यांनी आंदोलनाचा पुढील कार्यक्रमही जाहीर केला.
बो-हाडे म्हणाले, ‘राज्यात सत्ता द्या, मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देतो’ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खांद्यावर घोंगडी घेऊन आणि ढोल वाजवून आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. फडणवीस यांना आता ती संधी आहे म्हणून त्यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण केली पाहिजे. आमची मागणी संवैधानिक नाही आणि बारामतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत आपण खोटे बोललो होतो असे सांगून माफी मागून टाकावी! सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आपल्याला आरक्षण घ्यावे लागेल. देवाभाऊ चांगलं माणूस आहे म्हणून आम्ही मोर्चाच्या निमित्ताने त्यांचे फोटो असलेले फलक लावले. परंतु आरक्षणाबाबत फसवणूक झाली तर तोंडाला काळे लाऊ, असेही ते म्हणाले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी येत्या २६ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरून निवदने द्यावीत, २९ सप्टेंबर रोजी भाजप खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानांसमोर मेंढरे घेऊन आणि ढोल वाजवून धरणे धरावीत, त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी राज्यात चक्का जाम आंदोलन करावे, असा कार्यक्रम यावेळी बो-हाडे यांनी धनगर समाजास दिला. आपले उपोषण यापुढेही सुरुच राहील आणि १ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सभेला यांची उपस्थिती
सभेच्या ठिकाणी भूषणसिंह राजे होळकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यांच्यासह धनगर समाजातील अनेक नेते व्यासपीठाच्या खाली श्रोत्यांमध्ये होते. उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे वगळता पडळकर किंवा अन्य कुणाचेही भाषण झाले नाही. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना भाषणासाठी संधी देणे वेळेच्या अभावी शक्य नव्हते, असे बोऱ्हाडे यांनी सांगितले.
आरक्षणाच्या विषयावर सोबत
सभा सुरू होण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दत्तात्रय भारणे यांनी उपोषणस्थळी बो-हाडे यांची भेट घेतली. यावेळी उपस्थितांसमोर बोलताना भारणे म्हणाले, आरक्षणाच्या विषयावर मी तुमच्या सोबत आहे. धनगर समाजाचा आवाज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यन्त पोहोचविणार आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन.