सोलापूर : जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी केवळ मराठवाडय़ातील मराठय़ांपुरत्या मागण्या न करता संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी बोलावे. केवळ मराठवाडय़ातील मराठय़ांना कुणबी जातीचा दर्जा मिळावा या मागणीतून भेदभाव पुढे येत असल्याचे मत येथील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी व्यक्त केले आहे. असे केवळ एका भागातील मराठा समाजासाठी मागण्या होत असल्याने त्यांनी या आंदोलनास विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणाचा तिढा कायम; सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी, उपोषण सुरूच

केवळ एका भागातील मराठय़ांसाठीच मागण्या पुढे केल्या जात असल्याने या आंदोलनास पवार यांनी विरोध दर्शवला आहे. पवार हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तसेच भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर झालेल्या अनेक आंदोलनांत सहभाग घेतला होता. त्यांच्या या मागणीवर मतमतांतरे सुरू झाली आहेत. तथापि, पवार यांच्या या भूमिकेवर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, विनोद भोसले, राजन जाधव, योगेश पवार आदींनी पवार यांची भूमिका म्हणजे आंदोलन बदनाम करण्याचे षडय़ंत्र असल्याचा आरोप केला आहे.