कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची मुदत संपण्यापूर्वीच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या गळ्यात वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मंगळवारी नियुक्तीचा आदेश प्राप्त झाला. डॉ. शिर्के हे शिवाजी विद्यापीठातील कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पदाची कर्तव्ये सांभाळून वारणा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार धारण करतील, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.
पक्की सांख्यिकी
सांख्यिकी या विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. शिर्के यांचे कुलगुरूपदाची सांख्यिकी पक्की असल्याचे गेल्या काही वर्षांतील सलग कामगिरीतून दिसून आले आहे. सातारा येथे नव्याने स्थापित कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. आता शिवाजी विद्यापीठपाठोपाठ त्यांना वारणा समूहातही जबाबदारी मिळाली आहे.
मातृसंस्थेत कामाची संधी – डॉ. शिर्के
पदवीस्तरावरील प्रथम वर्षाचे शिक्षण हे वारणा संस्थेमध्ये झाले असल्याने ही निवड माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. शिवाजी विद्यापीठातील सेवा पूर्ण करीत असतानाच ही नवी संधी प्राप्त झाल्याने या मातृसंस्थेसाठीही काम करता येणार असल्याचा आनंद वाटतो, अशी भावना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.