सोलापूर : सोलापुरातील नामवंत मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर (वय ७०) यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या मनीषा महेश माने-मुसळे (वय ४५) हिच्या विरुद्ध पोलिसांनी तपासांती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, मनीषा माने-मुसळे हिच्या जामीन अर्जावर येत्या २१ जून रोजी न्यायालयात सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
रामवाडी भागातील एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयाचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्रभर मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून ख्यातकीर्त राहिलेले डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गेल्या १८ एप्रिल रोजी रात्री रेल्वे लाईन, मोदीखान्यातील आपल्या बंगल्यात पिस्तुलातून स्वतःच्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये कारणीभूत म्हणून त्यांच्याच रुग्णालयातील अधिकारी मनीषा माने-मुसळे हिचे नाव समोर आले होते. डॉ. वळसंगकर यांचे पुत्र डॉ. अश्विन वळसंगकर यांनी याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मनीषा माने-मुसळे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. १९ एप्रिलपासून ती अटकेत आहे.
या गुन्ह्याचा तपास सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पूर्ण केला. यात डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांच्यासह पुत्र डॉ. अश्विन, सून डॉ. सोनाली आदींसह ७३ व्यक्तींचे साक्षीदार जबाब नोंदविण्यात आले आहेत. १०८ कागदपत्रे आणि १९ वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपी मनीषा माने-मुसळे (रा. बसवराज नीलयनगर, जुळे सोलापूर) ही डॉ. वळसंगकर यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवेत होती. परंतु, असमाधानकारक कामामुळे तिला पदावन्नत करून तिच्या पगारात कपात करण्यात आली होती. त्यामुळे ती संतापली होती. त्यातूनच तिने डॉ. वळसंगकर यांना, मी दोन्ही मुलांना ठार मारते आणि आपल्या रुग्णालयात येऊन स्वतःला जाळून घेते. त्याला कारणीभूत म्हणून तुमचे नाव घेते, अशी धमकी त्यांच्या ई-मेलवर दिली होती. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांना मानसिक धक्का बसला. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी मनीषा माने-मुसळे हिने यापूर्वीच न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर येत्या २१ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत तर अर्जदारातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे हे काम पाहात आहेत.