अहिल्यानगर : पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आज, सोमवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे विजयी झाल्या. या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) बंडखोर नगरसेवक, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी पक्षादेश (‘व्हिप’) धुडकावत महायुतीचे उमेदवार नगरसेवक अशोक चेडे यांच्या बाजूने मतदान केले.
नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज विशेष सभा आयोजित केली होती. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. हात वर करून मतदान घेण्यात आले. निवडणुकीत डॉ. कावरे यांना ११, तर चेडे यांना ६ मते मिळाली.
या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, नीता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ. विद्या कावरेसह ११ नगरसेवकांनी मतदान करून विजय निश्चित केला. विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशिव औटी, युवराज पठारे, नीता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या ६ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गटनेते योगेश मते यांनी शनिवारीच ९ नगरसेवकांना व्हिप बजावत ‘डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे’ असे निर्देश दिले होते. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.
नगरसेवक आमिषाला बळी पडले नाहीत
निवडीनंतर खासदार नीलेश लंके यांनी नगरसेवक एकनिष्ठ राहिल्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘राजकारणात निष्ठा सर्वांत मोठी असते. मोठे आमिष असतानाही ‘मविआ’चे नगरसेवक डगमगले नाहीत, हीच खरी आमची ताकद आहे. डॉ. विद्या कावरे यांच्या विजयाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयाची नांदी झाली आहे, तर आमच्या सर्व कुटुंबाला व नगरसेवकांच्या निष्ठेला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे व डॉ. बाळासाहेब कावरे यांनी व्यक्त केली.
