स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या, कृषी, उद्योग, दुग्ध उत्पादनांत आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढत असून पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. सांगलीच्या जतमध्ये ते प्रचार सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाह म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना एकाही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता. केंद्रातील काँग्रेस सरकारने कायम राज्यातला मुख्यमंत्री बदलण्याचे काम केले. मात्र, तुम्ही फडणवीसांना निवडून दिले आणि मोदींनी त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. फडणवीसांसारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही जो दिवसरात्र जनतेसाठी काम करीत आहे. रात्रीच्या एक वाजता देखील कोणी त्यांच्याकडे गेल्यास ते त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात, अशा शब्दांत शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मला विचारायचे आहे की, त्यांनी १० वर्षांत राज्यासाठी काय केले. शरद पवारांनी पंधरा वर्षांत महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय केले? तुमच्या ५५ वर्षांच्या कामांपेक्षा आम्ही पाच वर्षांत केलेली कामं अधिक आहेत,” असा दावा यावेळी शाह यांनी केला. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने सांगलीसाठी काय केले हे सांगताना शाह म्हणाले, “सांगलीच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात मोदींनी ६००० रुपये थेट जमा करीत त्यांची मदत केली. सांगलीतील जनावरांच्या लसीकरणासाठी १३,५०० कोटी रुपयांचा निधी देत दुग्ध उत्पादन वाढवण्याचे काम फडणवीस सरकारने केले. इस्मारपूरमध्ये टेक्सटाईल पार्क बनवले, कोल्हापूर-पुणे दरम्यान डबल ट्रॅक रेल्वे सुरु केली. सांगलीत ११ लाख शेतकऱ्यांचे ३,७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. १ लाख घरांमध्ये शौचालये निर्माण केली. त्याचबरोबर फडणवीसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी पाणी वाटपाबाबत बोलणी केली. त्यानंतर येडीयुरप्पा सरकारने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले.”

शाह पुढे म्हणाले, “मनमोहन सिंग सरकारने राज्याला १,१५,५०० कोटी रुपये दिले तर मोदींनी २,४६,३५४ कोटी रुपयांची दुपटीहून अधिक मदत दिली. मौनी बाबा मनमोहन सिंग यांचे सरकार असताना देशाच्या जवानांना अपमानित केले जात होते त्यांचे शिर कापून नेले जात होते. यावेळीही तसेच होईल असे जनतेला वाटत होते. मात्र, यावेळी मौनी बाबा नव्हे तर ५६ इंच छाती असणारे पंतप्रधान मोदी होते त्यामुळे त्यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना उद्धवस्त केले.

वोट बँकेच्या राजकारणासाठी तुम्ही कलम ३७० हटवण्यास विरोध केला – शाह

“शरद पवारांनी सांगावे की आपण ३७० हटवण्याच्या बाजूने आहात की नाही. काश्मीर भारताचा अभिन्न भाग बनवावा याचा तुम्ही विरोध केला, कारण तुम्हाला वोट बँकेचे राजकारण करायचे होते. काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे तुम्ही म्हणाला होतात. मात्र, तिथे गोळ्या देखील चालवाव्या लागल्या नाहीत. सर्जिकल स्ट्राईकला तुम्ही विरोध करता, भारताच्या बालाकोटमध्ये जाऊन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्म्याला तुम्ही विरोध करता. जेएनयूत भारताचे तुकडे व्हावेत असे नारे दिले जातात त्यावेळी राहूल गांधी तिथे त्यांची बाजू घ्यायला येतात. तुम्हाला शिव्या द्यायच्या तर आम्हाला द्या, मोदींना द्या पण भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांना साथ का देता?,” अशा शब्दांत यावेळी शाह यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During fadnavis and modi government maharashtra started moving towards number one says amit shah aau