पंढरपूर : कार्तिकी यात्रेला राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सर्व सुविधा मंदिर समिती देणार आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत देवाचे अर्थात विठ्ठल रखुमाईचे दर्शन २४ तास राहणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. दरम्यान, कार्तिकी एकादशी २ नोव्हेबर रोजी आहे.
कार्तिकी यात्रा पूर्वनियोजनाबाबत मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे झाली. या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्त्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज म्हणाले, रविवार २ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजून वीस मिनीटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापूजा होणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे यासाठी परंपरेनुसार २६ ऑक्टोबर पासून २४ तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मंदिर जतन-संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्तिकी एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्रींची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. परंतू, राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणे, प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यामध्ये मुखदर्शन रांग, प्रशासकीय कार्यालय, अन्नछत्र व इतर अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देणे, कम्युनिटी रेडीओ केंद्र स्थापन करण्यासाठी ४ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनास प्रस्ताव देणे, एमटीडीसी भक्त निवासाचा करारनामा वाढवून घेण्याबाबत शासनास प्रस्ताव देणे इत्यादी निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.