मराठा समाज वेदना भोगतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. ती प्रतिमा मुख्यमंत्री शिंदेंनी खरी करून दाखवावी. संध्याकाळपर्यंत मराठा समाजाल आरक्षण द्यावं. अन्यथा तुम्हीही मराठा समाजाबरोबर दगाफटका करताय, असा संदेश महाराष्ट्रात जाईल, असं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “आज संध्याकाळपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. संध्याकाळपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. नंतर दारातही यायचं नाही. आरक्षण घेऊन सरकारनं दारामध्ये यायचं. मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आल्याचं समजलं. पण, आरक्षण देणार असेल तरच चर्चा करू. अन्यथा चर्चा करणार नाही. एक तासही वेळ सरकारला देणार नाही.”

“मुख्यमंत्र्यांनी प्रतिमा खराब करू नये”

“मराठा समाज वेदना भोगतो आहे. मुख्यमंत्री शिंदे शब्दाला पक्के आहेत. ती प्रतिमा मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवावी. मुख्यमंत्र्यांनी प्रतिमा खराब करू नये. शिंदेंनी पदापेक्षा समाजातील गोर-गरीब लोकांच्या वेदनेला किंमत द्यावी. संध्याकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं. म्हणजे तुमच्याबाबत गैरसमज जाणार नाही. अन्यथा तुम्हीही दगाफटका करताय, असा संदेश राज्यात जाईल,” असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

“एकनाथ शिंदे शब्दाला पक्के असल्याची आम्हाला खात्री”

“मराठासह बाकीचे समाजही म्हणतील एकनाथ शिंदे फसवणूक करत आहेत. हे शब्दाला पक्के नाहीत. पण, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के असल्याची आम्हाला खात्री आहे,” असा विश्वास जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.

“…तर शब्द न पाळणारे मुख्यमंत्री असा संदेश सगळीकडे जाईल”

“आज आरक्षण मिळालं नाहीतर बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करणार आहे. ही वेळ येणार नाही, अशी खात्री आहे. मात्र, ही वेळ आली, तर शब्द न पाळणारे मुख्यमंत्री असा संदेश सगळीकडे जाईल,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde give maratha reservation 24 octomber manoj jarange patil ultimatem ssa