Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागच्या महिन्यात उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तसंच आदित्य ठाकरे हेदेएखील तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले होते. सामनातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं. या सगळ्या बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीला जनतेने धडा शिकवला असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा तो झांकी है.. महापालिका बाकी है-एकनाथ शिंदे

विधानसभा तो झांकी है, महापालिका बाकी है. पिक्चर अभी बाकी है. असं म्हणत नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली, हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली, स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी केल्या त्यांना लोकांनी धडा शिकवला. महाराष्ट्रातून जनतेचा ओघ शिवसेनेत येतो आहे ही याची पोचपावती आहे. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“सरडाही रंग बदलतो पण अशा प्रकारची नवी जात…”

“घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री असं काही लोक मला म्हणत होते. तसंच देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणारे, देवेंद्र फडणवीस यांना तू राहशील किंवा मी राहिन म्हणणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं. सरडाही रंग बदलतो पण अशा प्रकारची नवी जात आताच पाहिली. ज्यांना लोकांनी झिडकारलं, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवून दिली. जनतेने त्यांचा कचरा केला. त्यामुळे कुठेतरी आता तुम लढो हम कपडा संभालते हैं सारखं तुम लढो हम बुके देकर आते है असं चाललं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणीही भेटू शकतं. सामान्य माणूस असो किंवा कुठल्या पक्षाचा नेता असो तो भेटू शकतो. मलाही अनेक लोक भेटायचे”, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”

“देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचं कारस्थान करणाऱ्यांना…”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना कुणीही भेटू शकतं. अत्यंत टोकाचा मत्सर, द्वेष आणि फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचं कारस्थान करणाऱ्या लोकांना इतक्या लवकर उपरती सुचली ही चांगली गोष्ट आहे. असाही टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. संस्कृती, संस्कार हे महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं. कारण मविआ शिव्या-शाप आणि आरोप एवढंच करत होते. मात्र आम्ही महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार जपले. आम्ही आरोपांना उत्तर दिलं नाही. कामांमधून उत्तर दिलं. त्यामुळे जनतेने त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत संस्कार आणि संस्कृती शिकवली” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde slams uddhav thackeray aditya thackeray on meeting with cm devendra fadnavis scj