रत्नागिरी – जयगड येथील जिंदाल बारमाही बंदर आणि वीज कंपनीच्या नांदीवडे येथील गॅस टर्मिनलच्या बांधकामाचा असलेला ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला खोटा असून त्याची जिल्हाधिका-यां मार्फत चौकशी व्हावी. तसेच याबाबतचा अहवाल येत्या १५ दिवसात द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांनी केली आहे.

याविषयीचे निवेदन देत, हा नाहरकत दाखला खोटा निघाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करुन येथील शेतकरी व ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे ही म्हटले आहे. नांदिवडे येथील गॅस टर्मिनल प्रकल्पा विरोधात येथील ग्रामस्थांचा काही महिने लढा सुरु आहे. या विरोधात ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली आहेत. या बाबत न्यायालयीन लढा देखील सुरु ठेवला आहे.

मात्र जिंदाल कंपनीने खोटा नाहरकत दाखला घेवून बांधकाम सुरु केले. नांदीवडे ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हा दाखला दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या भागात फक्त कंपनीला बारमाही बंदर व वीज निर्मिती कंपनीला कोणतीही हरकत नसल्याचा दाखला दिला आहे. मात्र गॅस टर्मिनल प्रकल्पाला दाखला देण्यात आला नाही, असे ग्रामपंचायतिकडून कळविण्यात आले.

नांदिवडे येथील या प्रकल्पा बाबत घेण्यात आलेल्या बैठकीत जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे येथील कामाचा पंचायतीचा ना-हरकत दाखला असल्याचे सांगितले होते. मात्र या ना-हरकत दाखल्याची पडताळणी करण्यात आली असता त्या दाखल्यावर जावक क्रमांक व ठराव दिनांक नसल्याचे उघड झाले आहे. अशा नाहरकत दाखल्याची दफ्तरात कुठेही नोंद नसल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांनी केला आहे. याविषयी पाटील यांनी रत्नागिरी जिल्हाधिका-यां ना निवेदन देत बोगस ना-हरकत दाखल्याची चौकशी करुन १५ दिवसात अहवाल देण्याची मागणी केली आहे. या ना-हरकत दाखल्याची कोणतीही अधिकृत नोंद सापडली नसल्याचे अॅड. पाटील यांनी नमुद केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या चौकशीमध्ये हा नाहरकत दाखला खोटा आढळल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करून गॅस टर्मिनल तात्काळ स्थलांतरित करण्यात यावा. तसेच जिंदाल कंपनीने स्थानिक ग्रामस्थांचे शेती, मच्छिमारी आणि फळबाग यांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अॅड. स्वप्नील पाटील यांनी रत्नागिरी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

नांदीवडे गॅस टर्मिनल बांधकामाचा कोणताही खोटा नाहरकत दाखला देण्यात आलेला नाही. या दाखल्या नंतरच येथील बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे. जरी कोणाची तक्रार असेल तर ते चौकशीत स्पष्ट होईल… – सुदेश मोरे, व्यवस्थापक, जिंदाल एनर्जी आणि फोर्ट, कंपनी.