एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वावटळीचा पुढचा अंक सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच आपलं शासकीय निवासस्थान सोडलं आहे. ते मातोश्रीवर रवाना झाले आहेत. दरम्यान रस्त्यावर हजारो शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील गाड्यांचा ताफा थांबवून शिवसैनिकांचं आभिवादन स्वीकारलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मलबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ऑनलाइन पद्धतीने फिर्याद दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी करोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती आज सकाळी माध्यमांकडून देण्यात आली होती. फेसबूक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्याला करोनाची बाधा झाल्याचं सांगितलं होतं. असं असताना देखील मुख्यमंत्री अनेक शिवसैनिकांना भेटले, असा आरोप बग्गा यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत बग्गा यांनी ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

करोना नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली, तर त्याला कुणालाही भेटता येत नाही. रुग्णाला गृहविलगीकरणात राहावे लागते. असं असताना देखील मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचं बातम्यांमध्ये दिसलं आहे. याआधारे तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filed a police complaint against uddhav thackeray for violating corona rules rmm