कराड : यशवंत सहकारी बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे शासकीय लेखा परीक्षणात उघड झाल्याने बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांविरुद्ध कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याप्रकरमी तक्रार दिली आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे निवारण शाखेकडे वर्ग होणार असल्याचे कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. चरेगावकर हे भाजपशी संबंधित असून, त्यांच्यावरील कारवाईने खळबळ उडाली आहे.

फलटण येथे मुख्यालय असलेल्या यशवंत बँकेतील गैरव्यवहार गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आला. बँकेची थकीत कर्जवसुली आणि ठेवीदारांचे पैसे मिळण्यास अडचण येऊ लागल्याने बँकेच्या कारभाराविषयी सर्वत्र ओरड सुरू झाली होती. ठेवी मिळणे बंद झाल्यानंतर अनेकांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या. बँकेतील हा बहुचर्चित गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा घेत भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनीही चौकशीची मागणी केली होती. त्यांनी याबाबत राज्यातील नेत्यांसह केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा, तसेच रिझर्व्ह बँकेकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.

बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू करण्यात आली होती. या अंतर्गतच शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी केलेल्या लेखा परीक्षणातून यशवंत बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. यामध्ये १९५ बोगस कर्ज खाती असल्याचे नमूद करण्यात आले. या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात चरेगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासोा पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहल कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुंद्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, दिनेश नवळे यांचा समावेश आहे.

गैरव्यवहार, ठपका काय?

यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी व संचालकांनी ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ यादरम्यान स्वत:च्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपये रकमेचा अपहार केला. त्यासाठी बोगस कर्ज प्रकरणे करून या प्रकरणांसाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. कर्जास तारण न घेता हेतुपुरस्सर कर्जवितरण करून जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडली. त्याद्वारे निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून निधी वळवला. तसेच दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी तयार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून अपहार केल्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

शेखर चरेगावकर कोण आहेत?

सामान्य कुटुंबातील शेखर चरेगावकर यांचा एका पतसंस्थेचे अल्पबचत योजना प्रतिनिधी (पिग्मी एजंट) ते यशवंत सहकारी बँक आणि राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष असा थक्क करणारा प्रवास आहे. त्यांनी आजारी स्थितीतील यशवंत बँक चालवण्यास घेतली होती. विशेष म्हणजे चरेगावकर यांनी सहकार आणि सहकारी संस्था आदर्श पद्धतीने कशा चालवाव्यात, यासंबंधी महाराष्ट्रभर प्रबोधनात्मक व्याख्याने दिली होती. त्यांना या व्याख्यानांसाठी परराज्यांतही निमंत्रित केले जात होते. आता हेच चरेगावकर स्वत:च एका सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. चरेगावकर हे भाजपशी संबंधित असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.