सांगली : कोल्हापूर, नाशिकनंतर सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील वानलेसवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाकडून केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. वालचंद महाविद्यालयातील चलचित्रीकरण कॅमेर्‍यात बिबट्या आढळल्याने या परिसरात वन विभागासह पोलीसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. बिबट्याचा वावर आढळल्याने नागिरकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

रविवारी रात्री एका दुचाकीस्वाराला सांगली-मिरज रस्त्यावर एका बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. या दरम्यान, दुचाकीस्वाराने हा बिबट्या दक्षिण दिशेला असलेल्या कुंभार मळा परिसरात गेल्याचे सांगितले. वन विभागाने सोमवारी या परिसरात पडताळणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसे या परिसरात मिळाले. यामुळे या परिसरात बिबट्या असण्यावर वन विभागाने शिक्कामोर्तब करत गस्त सुरू केली.

सोमवारी दिवसभर या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले नसले तरी सोमवारी रात्री मुख्य रस्त्याच्या उत्तर बाजूस असणार्‍या विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ वारणाली परिसरातील एका शाळेच्या आवारात बिबट्याचा वावर दिसला. ही माहिती मिळताच मानद वनजीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी या घटनास्थळी धाव घेतली. वारणाली परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपर्यंत शोध मोहिम राबवूनही परत बिबट्या आढळला नाही.

वानलेसवाडी, गव्हर्मेट कॉलनी, वालचंद महाविद्यालय, वारणाली परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागामार्फत सदर परिसरामध्ये वनविभागाचे जलद कृतीदल बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात आले होते. तथापी प्रत्यक्ष बिबट्या दिसून आला नव्हता. . रात्री वन विभागाचे कर्मचारी तसेच जलद कृतीदल व पोलिस यांचेमार्फत संयुक्त पणे भारती हॉस्पिटल परिसर वालनेस वाडी परिसर, विजयनगर, हसणी आश्रम, वालचंद कॉलेज परिसर विश्राम बाग या भागात गस्त करत पहाटे पर्यंत पाहणी केली.

गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असला तरी आज पर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. बिबट्याकडून पशुधन अथवा मनुष्यहानी किंवा त्यावरती हा झालेली घटना कोठेही घडलेली नाही. तरी सुध्दा सदर परिसरातील व आसपासच्या सर्व नागरीकांना दक्षता घेण्याची सूचना करणेत येत आहे. सदर परिसरामध्ये वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावलेले असून संपूर्ण परिस्थितीवर वन विभाग, जलद कृती दल व पोलिस लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनीही बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले असून वन विभागाचे कर्मचारी सतर्क असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.