Kapil Dev on farmers Suicide: भारताला क्रिकेटमधील पहिला एकदिवसीय विश्वचषक मिळवून देणारे क्रिकेटपटू कपिल देव हे खेळासोबतच त्यांच्या सामाजिक जाणीवेबाबतही ओळखले जातात. क्रिकेट व्यतिरिक्त त्यांनी अनेकदा सामाजिक विषयांवर भाष्य केलेले आहे. खासकरून प्राणी मित्र म्हणून त्यांची ओळख आहे. यासाठी त्यांनी न्यायालयाचेही दरवाजे अनेकवेळा ठोठावले आहेत. सध्या ते नांदेडमध्ये आले असताना पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांबद्दल प्रश्न विचारला. स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेल्या कपिल देव यांनी त्यावर शेतकरी आपला हिरो असून त्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिल देव म्हणाले, “शेतकरी खूप मेहनत करतो. ते सर्वांना अन्न पुरविण्याचे महत्त्वाचे काम करतात. जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या कानावर येतात तेव्हा दुःख होतं. मी शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की, त्यांनी मनातील विश्वास ढळू देऊ नये. वाईट वेळ सर्वांच्याच आयुष्यात येत असते. पण आपणच जगाला संघर्ष काय असतो हे दाखवून दिले आहे.”

हे वाचा >> Success Story: इंजिनिअर झाला शेतकरी… आरोग्यासाठी आयटी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून केली शेती; वर्षाला लाखोंची कमाई

शेतकरी आमच्यासाठी हिरो

“संपूर्ण देशाला अन्न पुरविणारा शेतकरी जर अडचणीत असेल तर आपण सर्वांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहीजेत. नवीन तंत्रज्ञान येत आहे, शेतकऱ्यांनीही त्याकडे लक्ष ठेवले पाहीजे. जेणेकरून शेतकरी कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही”, असेही कपिल देव म्हणाले. शेतकरी आमचा हिरो आहे. जर ते आनंदी नसतील तर आम्हीही आनंदी राहू शकत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे आम्हालाही दुःख होते. आमच्यासाठी तर शेतकरी हिरो आहे, असेही कपिल देव म्हणाले.

हे ही वाचा >> शेतकरी मित्रांनो शेतात मोटार चालू करायला जाताय? थांबा, या शेतकऱ्याबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल

हरियाणा विधानसभा निवडणुकीवर काय म्हणाले?

हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष जिंकेल, असाही प्रश्न कपिल देव यांना विचारण्यात आला. कपिल देव यांचा जन्म हरियाणाची राजधानी चंदीगड येथे झाला आहे. त्या अनुषंगाने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र कपिल देव यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, मी ज्यादिवशी राजकारणावर बोलायला लागेल, त्यादिवशी शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी काम करू शकणार नाही. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांवरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. सरकार त्यांच्यापरिने काम करत आहोत. आपण देशाचे नागरिक म्हणून काय करू शकतो, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही कपिल देव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricket player kapil dev urges farmers to not do suicide at nanded press conference kvg