Balasaheb Thorat : काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांना चांगलंच सुनावलं आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील सत्यजित तांबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या विधानावरून त्यांना चांगलंच सुनावलं आहे. सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं असल्याचं थोरातांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“आमदार सत्यजित तांबे हे राहुल गांधी आणि काँग्रेसबाबत बोलले हे खरं आहे. आता ते (सत्यजित तांबे) आमदार आहेत. त्यामुळे मला यामध्ये दोन गोष्टी बोलाव्या लागतील. आपल्या जीवनात ज्यांनी कोणी काही केलेलं असेल तर त्यांचे ऋण तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजेत. काँग्रेस पक्षाचं योगदान सत्यजित तांबे यांच्यासाठी खूप महत्वाचं राहिलेलं आहे. तसेच या निमित्ताने मी आणखी एक सांगेल की आमदार सत्यजित तांबे यांचं जे बोलणं आहे ते बालिशपणाचं आहे. त्यामुळे त्यांना आणखी काही गोष्टी शिकाव्या लागतील”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
“काही गोष्टी मांडायला हरकत नाही. पण तुम्ही आता स्वतंत्र झाले, तुमचं युवक काँग्रेसच्या पदाच्या पुढंच वय गेलं. त्यामुळे आता कोणती मांडणी कुठे करावी आणि कोणती नाही? हे शिकलं पाहिजे. आपल्या जीवनात ज्यांनी कोणी काही दिलेलं असेल त्यांचे ऋण माणसांनी कायम लक्षात ठेवले पाहिजेत. अंतकरणात तरी ऋण ठेवले पाहिजेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सत्यजित तांबे काय म्हणाले होते?
दरम्यान, सत्यजित तांबे यांनी एका मुलाखतीत बोलताना महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना थेट आव्हान दिलं होतं. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी राहुल गांधी यांना एका तासात भेटून दाखवावं, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं होतं. तसेच काँग्रेस पक्षाच्या धोरणावरही सत्यजित तांबे यांनी टीका केली होती.