संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही जागांवरील निकाल हाती आले आहेत. धुळे, नंदुरबार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर आता नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे हर्षवर्धन दहिते व राजेंद्र देसले, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलमधून चंद्रकांत रघुवंशी, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील व संदीप वळवी हे विजयी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या भावाचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. माजी आमदार शरद पाटील यांनी त्यांना पराभूत केले आहे. या निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलतर्फे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्नभंग करणार्‍या पोपटराव सोनवणे यांचा पुत्र अक्षय सोनवणे यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. सोनवणे यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे.

दरम्यान १७ जागांपैकी ७ जागा या आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यापैकी सहा जागांवर भाजपा पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल विजयी झाले आहे. तर एका जागेवर शिवसेनेला विजयी मिळाला आहे.

या निवडणुकीसाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, अंकुश पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माधवराव धनगर, हर्षवर्धन दहिते, सुरेश रामराव पाटील माजी आमदार शरद पाटील, यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

सर्व जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला ९ तर भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला ८ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आता धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी कोण विराजमान होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former union minister subhash bhamre brother defeated in dhule nandurbar district central bank election abn