लोकसत्ता वार्ताहर

नांदेड: वजिराबाद गुन्हे शोध पथकाने ऑल आऊट ऑपरेशन राबवून तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार गावठी पिस्तुल, ३० जिवंत काडतुस, एक मॅग्झीन व गुन्हयात वापरलेली मोटरसायकलसह १ लाख १३ हजार १०० रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३ मार्च रोजी घडलेल्या गोळीबार घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, सिध्देश्वर भोरे यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने ६ एप्रिल रोजी अचानक ऑल आऊट ऑपरेशन राबवून अभिलेखावरील शस्त्र बाळगणाऱ्या अनेक गुन्हेगारांना चेक करुन त्यांच्या हालचालीची व नांदेड शहरात शस्त्र आणून विक्री करणाऱ्या बाबतची माहीती घेण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा- सांगली: उदमांजराची शिकार करणारी टोळी वन विभागाच्या ताब्यात

७ एप्रिल रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हिंगोली गेट उड्डानपुलाच्या खालील फुलमार्केट परिसरामध्ये सापळा रचून एक जण गर्दीमध्ये संशयास्पद हालचाली करीत असताना दिसून आल्याने त्यास पकडुन त्याची विचारपूस करण्यात आली. भोलासिंघ उर्फ हरजितसिंघ उर्फ पोलो पिता चरणसिंघ बावरी (रा.एनडी ४१ सिडको नांदेड) असे सांगितले. पथकाने पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व सात जिवंत काडतुस, गुन्हयात वापरलेली मोटरसायकल मिळुन आली. सदर प्रकरणी पोलीस नाईक विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हयाच्या तपासात तपासीक अंमलदार शिवराज जमदडे यांनी आरोपीस अधिक विश्वासात घेउन विचारणा केली असता आरोपीने इतर तीन गावठी पिस्टल व काडतुस नांदेड शहरात विक्री केल्याची माहिती दिल्यावरुन आरोपी रोशन सुरेश हाळदे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडुन एक गावठी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले. तसेच महमद तौफीक शेख सनदलजी यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल मॅग्झीनसह, २३ जिवंत काडतुस एक रिकामी मॅग्झीन जप्त करण्यात आली आहे.