छत्रपती संभाजीनगर : नवउद्यमींसाठी (स्टार्टअप) विविध क्षेत्रांतून तीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोबतच ‘मैत्री २.०’ पोर्टलही लवकरच सुरू होणार असून, त्या माध्यमातून १२० सेवा एका खिडकीतून मंजूर होतील. यावर्षी १५ नव्या धोरणांची घोषणा केली जाणार असून, त्यामध्ये संरक्षण, इव्हेंट, लॉजिस्टिक्स, डीपटेक व विशेष एमएसएमई धोरणांचा समावेश असेल, अशी माहिती महाराष्ट्र उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन यांनी येथे दिली.

येथील सीएमआयए बजाज भवन येथे मराठवाडा ॲक्सेलेटर फाॅर ग्रोथ ॲण्ड इन्क्युबेशन कौन्सिल अर्थात ‘मॅजिक’च्या वतीने ‘स्टार्टअप मंथन’ या विशेष संवाद सत्राचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात भारत सरकार व महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ धोरणकर्त्यांनी मराठवाड्यातील नवउद्यमींशी थेट संवाद साधला. या सत्रात डीपीआयआयटीचे अमरदीप भाटिया, एमआयसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रजत सैनी आणि ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. डी. मलिकनेर, ज्येष्ठ उद्योजक तथा मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अमरदीप भाटिया यांनी नवउद्यमींना आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने विकसित करण्याचे आवाहन केले. भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे. सर्व अडचणी असूनही इथे सुरू असलेली २० हून अधिक एकस्व हक्क (पेटंट) मिळवलेल्या नवउद्यमींची वाटचाल ही टियर २-३ शहरांसाठी अभिमानास्पद आहे. मराठवाड्यातील नवोपक्रमांना अधिक चालना मिळावी यासाठी मॅजिकने दिशा निश्चित करावी, असे भाटिया यांनी सूचित केले.

आशिष गर्दे यांनी टियर-२ व ३ शहरांमध्ये नवउद्यमींसाठी संधी निर्माण करण्यासाठी मॅजिकने विविध उपक्रम राबवले असल्याचे सांगून ग्रामीण व निमशहरी भागांतील नवउद्यमींचे स्वतंत्र धोरण तयार करण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी मॅजिकचे संचालक मिलिंद कंक, सुनील रायठठ्ठा, सुरेश तोडकर, नितीन काबरा, तसेच सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माच्छर, मानद सचिव मिहीर सौंदलगेकर, मुकुंद कुलकर्णी, सौरभ छल्लानी, उमेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.