सोलापूर : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असताना सोलापुरातही हे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत चार संशयित रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे चारही रुग्ण मूळचे सोलापूरचे नाहीत तर शेजारच्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील आहेत. दोन दिवसांपूर्वी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संशयित रुग्ण शोधण्यासाठी येत्या दोन दिवसांत घरोघरी सर्वेक्षण हाती घेण्याचे ठरविले आहे. जीबीएस आजार दुर्मीळ असून संसर्गजन्य नाही. मात्र तरीही या आजारावर मुबलक औषधे आणि आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटींचा निधी तातडीने मंजूर झाला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळचा सोलापूरचा आणि गेल्या अनेक वर्षापासून पुण्यात नोकरी करणाऱ्या एका सनदी लेखापालाला जीबीएस आजाराचे निदान झाले होते. त्यास सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. दरम्यान, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना संबंधित रुग्णाचा जीबीएस आजाराने मृत्यू झाल्याचे पुन्हा स्पष्ट केले. याबाबत रासायनिक पृथक्करण अहवालातून मृत्यूचे कारण समोर येण्याची औपचारिकता बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरात काही रुग्णालयांत जीबीएस आजाराचे चार संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र हे चारही रुग्ण सोलापूरचे नाहीत तर शेजारच्या लातूर, निलंगा, तुळजापूर भागातील आहेत, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

जीबीएस आजार दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून होतो. त्याचा विचार करता सोलापूर महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत खाद्यपदार्थ उघड्यावर आणि दालनातून विकले जातात. यासह विविध बाजारपेठांत या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी शिळे अन्न खाऊ नये आणि पिण्याचे पाणी उकळून प्यावे, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, ताप, खोकला, सर्दी-पडसे आणि अंगदुखी वाढल्यास डॉक्टरांच्या परस्पर औषध दुकानांतून औषधे न घेता डॉक्टरांकडे जाऊनच उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

जीबीएस आजारावर उपचारासाठी आवश्यक औषधे इमोग्लोबिन तसेच इंडक्शन स्टडीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेप्रमाणे दोन कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता पडेल तर आणखीही निधी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात जीबीएस आजाराच्या संशयित रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. लहान मुलांसाठी पाच आणि प्रौढ रुग्णांसाठी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटर आणखी वाढवण्यात येतील, अशी माहिती दिली

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिलेल्या माहितीनुसार जीबीएस आजारावर शासकीय आरोग्य योजनेत वैद्यकीय खर्चाची मर्यादा ८० हजारांवरून एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. मात्र येणारा वैद्यकीय खर्च मोठा असल्याने येत्या काळात रुग्ण वाढल्यास वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध होण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाची चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gbs cases are increasing in the state including in solapur sud 02