वाई: राज्यपाल रमेश बैस उद्या सोमवारपासून (दि. २२) पाच दिवस साताऱ्यातील महाबळेश्‍वर दौऱ्यावर येत आहेत. राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरिदर्शन या बंगल्यामध्ये ते मुक्कामी असतील. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरासह बेल एअर रुग्णालय तसेच प्रेक्षणीय स्थळांनाही ते भेटी देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यपाल बैस हे मागील आठवड्यात १० मे ते १७ मेपर्यंत सात दिवसांच्या महाबळेश्‍वर दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला. आता राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे राजभवन परिसरात लगबग वाढली असून, स्वागतासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.राज्यपाल रमेश बैस यांचे उद्या (सोमवारी) सकाळी अकराच्या सुमारास हेलिकॉप्टरने वाई येथील किसन वीर कॉलेजच्या मैदानावरील हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते बेल एअर हॉस्पिटलला भेट देतील. त्यानंतर साडे अकराच्या दरम्यान पुस्तकाचे गाव भिलारला भेट देतील. त्यानंतर पावणे एकच्या सुमारास ते राजभवन महाबळेश्वरला जातील व तेथे मुक्कामी राहतील.

मंगळवारी (दि.२३) दुपारी दोन वाजता जिल्ह्यातील अधिकऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. तर दुपारी चार वाजता सातारा जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्यासमवेत बैठक असेल.बुधवारी (दि. २४) दुपारी चार वाजता ते प्रतापगड किल्ल्याला भेट देणार आहेत. साडे सहा वाजता ते परत राजभवना येतील व मुक्कामी राहतील. गुरुवारी (ता. २५) सकाळी पावणे अकराच्या सुमारास हेलिकॉप्टरने मुंबई राजभवनसाठी रवाना होतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor ramesh bais on a visit to mahabaleshwar from tomorrow amy