राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली. राज्यभरातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये राज्यातील चारही प्रमुख पक्षांना म्हणजेच काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संमिश्र यश मिळाल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच एका ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाच्या पॅनलने सर्वांना धोबीपछाड देत विजय मिळवला आहे. आठवलेंच्या पॅनलने मिळवलेल्या या विजयाची सध्या सगळीकडे चर्चा सुरुय.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी अक्कलकोटमधील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपलं पॅनल उतरवलं होतं. आरपीआय नेते विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये पक्षाच्या पॅनलला अभूतपूर्वी यश मिळालं आहे. निवडणुकीचं योग्य नियोजन, स्थानिक प्रश्नांची जाण, घरोघरी जाऊन केलेला प्रचार, लोकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास या चारही बाजू गायकवाड यांनी अचूकपणे संभाळत पक्षाला विजय मिळवून दिला. बँगेहळ्ळी ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात जागा आहेत. या सातही जागांवर गायकवाड पॅनलचे उमेदवार निवडून आलेत. आरपीआयने मिळवलेला हा विजय या निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या काँग्रेस आणि भाजपासारख्या मोठ्या पक्षांनाही धक्का देऊन गेलाय.
सोलापूर जिल्ह्यात ५८६ ग्रामपंचायतींसाठी आज मजतमोजणी झाली. जिल्ह्यातील एकूण ६५७ ग्रामपंचायतींपैकी ६७ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली तर चार ठिकाणी निवडणुकांना स्थगिती मिळाली. सोलापुरातील अनेक निकाल धक्का देणारे ठरले मात्र आठवले गटाने मिळवलेला हा विजय सध्या स्थानिक पातळीवरच नाही तर राज्य पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.
किती टक्के मतदान झालं?
ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. काही ठिकाणी तुरळक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये होईल. एकू ण १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला होता. १५२३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात २६,१७८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकू ण ४६,९२१ प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.
जिल्हानिहाय संख्या
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : ठाणे -१४३, पालघर- ३, रायगड- ७८, रत्नागिरी- ३६०, सिंधुदुर्ग- ६६, नाशिक -५६५, धुळे -१८२, जळगाव -६८७, नंदुरबार- ६४, नगर -७०५, पुणे -६४९, सातारा- ६५२, सांगली- १४२, कोल्हापूर- ३८६, औरंगाबाद- ५७९, बीड- १११, नांदेड- १०१३, परभणी- ४९८, उस्मानाबाद- ३८२, जालना- ४४६, लातूर- ३८३, हिंगोली- ४२१, अमरावती- ५३७, अकोला- २१४, यवतमाळ- ९२५, वाशीम- १५२, बुलढाणा- ४९८, नागपूर- १२७, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६०