राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नाराजीनाट्यावरून मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांसह भाजपा पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. जिवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली असली तरी लवकरच महाराष्ट्रात सत्तांतर घडू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय महाभूकंपाबाबत गुलाबराव पाटलांनी मोठं विधान केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपानं लिहिली”, फडणवीसांचं नाव घेत सुषमा अंधारेंचं टीकास्र!

अजित पवार यांच्या नाराजीनाट्यावर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मला वाटतं अजून तिथी जवळ आली नाही. गुणही जुळत नाहीयेत. त्यामुळे कोणती पूजा करावी लागेल? हे एखाद्या ब्राह्मणाला विचारायला लागेल. पण ती वेळ नक्की येईल, काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यामुळे राजकीय महाभूकंपाबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा- “संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही…”, अजित पवारांचा उल्लेख करत संजय शिरसाटांची टीका!

अजित पवारांचा भाजपाला पाठिंबा देण्याचा मुहूर्त खरंच जवळ आला आहे का? असं विचारलं असता गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “ही वेळही लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे, अशी मिश्किल टिप्पणीही गुलाबराव पाटलांनी केली. “याला अजून किती दिवस लागतील, हे ब्राह्मणाला विचारावं लागेल. कारण वरचा ब्राह्मण फार कठीण आहे,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil reaction on ajit pawar joining bjp with 40 ncp mlas rmm