अहिल्यानगर: अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. केवळ पंधरा दिवसांत १ हजार ३४ गावांतील ४ लाख ८७ हजार २६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील जवळपास ४० टक्के पिकांचे नुकसान केले.

राज्य सरकारने एक रुपयातील पीकविमा योजना बंद केली, त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची मदार राहणार आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार नगर तालुक्यात १०६ गावांतील ७२ हजार ५५१ शेतकऱ्यांचे ६२ हजार ७०० हेक्टवर, पारनेर ११४ गावांतील ४६ हजार ८१५ शेतकऱ्यांचे २४ हजार २६१ हेक्टर, पाथर्डी १३७ गावांतील १ लाख २ हजार ५८० शेतकऱ्यांचे ७७ हजार १५५ हेक्टरवर, कर्जत ११९ गावांतील २५ हजार ८६ शेतकऱ्यांचे १६ हजार ५८ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले.

जामखेडमधील ८७ गावांतील ४९ हजार ९३६ शेतकऱ्यांचे ३४ हजार ३२३ हेक्टरवर, श्रीगोंदा ६८ गावांतील ६ हजार ४०२ शेतकऱ्यांचे ३ हजार १६३ हेक्टरवर, श्रीरामपूर तालुक्यातील ५५ गावांतील ३६ हजार ८८६ शेतकऱ्यांचे २५ हजार ३६१ हेक्टरवर, राहुरी ९६ गावांतील १९ हजार ८४२ शेतकऱ्यांचे १२ हजार १३३ हेक्टरवर, नेवासा तालुक्यातील १२५ गावांतील ४० हजार ८५७ शेतकऱ्यांचे २४ हजार ९०४ हेक्टरवर, शेवगाव तालुक्यातील ११३ गावांतील ८५ हजार ४१७ शेतकऱ्यांचे ५८ हजार ६५५ हेक्टरवर, कोपरगाव तालुक्यात २ गावांतील ११० शेतकऱ्यांचे ३० हेक्टरवर आणि राहाता तालुक्यातील १२ गावांतील १ हजार ८८४ शेतकऱ्यांचे १ हजार ५१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे आणि क्षेत्राचे जवळपास ४० टक्के पंचनामे झालेले असून सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याला आता वेग येणार आहे.

दरम्यान, आज, सोमवारी सकाळी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत नुकसान झालेल्या तालुक्याचा आढावा घेतला. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागातील नागरिकांना तातडीने सुविधा देण्यासह पंचनाम्यांचा वेग वाढवण्याची सूचना केली आहे.

दीड हजारांवर घरांची पडझड

गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसात १ हजार ५९१ घरांची पडझड झालेली आहे. यासह १८ ठिकाणी जनावरांचे गोठे पडले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या ६ झाली आहे. ३३ मोठी दुधाळ आणि ३२ लहान जनावरे मृत्युमुखी पडली. तसेच ५९७ ठिकाणी घरात पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.