सातारा : साताऱ्यात मध्यरात्री व पहाटेपासून दुष्काळी माण-खटावला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. बाणगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली. सातारा-पंढरपूर रस्ता पाण्याखाली गेला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेती, रस्ते, घरे, दुकाने पाण्याखाली गेली आहेत. सातारा-पंढरपूर रस्त्यावर मोठे पाणी आल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. माण तालुक्यात मोठा पाऊस झाल्याने प्रशासनानेदेखील पूर्ण लक्ष तालुक्यावर केंद्रित केले आहे.

म्हसवड – म्हसवड येथे ८५.०८ मिलिमीटर, तर शिंगणापूर व मार्डी येथे प्रत्येकी ६८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आश्चर्य म्हणजे महाबळेश्वरमध्ये आज ४१.५ मिमी पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यातील या दुष्काळी भागात याहून जास्त पाऊस झाला आहे.सातारा जिल्ह्यात मागील २४ तासांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सातारा शहर, महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, वाई, जावली कोरेगाव, फलटण, खंडाळा सर्व शहरी व ग्रामीण भागात पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. वाहतूक ठप्प झाली आणि शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. म्हसवड परिसरातील भाटकी येथील एकमेव पाझर तलाव भरला नव्हता. आज पहाटे भरुन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानजीकच्या वडजाई ओढ्यास पूर आला.

पावसामुळे सर्वत्रच दैना उडाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या वतीने नागरिकांना खबरदारी घेण्याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. याबरोबरच गरज पडली, तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले. गेल्या २४ तासांच्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. शहरी भागातही नाले तुडुंब भरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. शेतकरीवर्ग पावसामुळे धास्तावला आहे. अचानक आलेल्या या पावसाने खरीप पिकांवर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर नव्हे, तर खटाव-माणसारख्या दुष्काळी तालुक्यांत मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे लक्ष आता या भागाकडे लागले आहे.

मागील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे या परिसरातील पिके, शेती, रस्ते पाण्याखाली आहेत. खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटेपासून झालेल्या पावसाने जनजीवन पूर्ण विस्कळीत करून टाकले आहे.
सर्वत्रच जोरधार

पावसाने शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्रच जोरधार लावली होती. सातारा तालुक्यात ३० मिमी, जावळीमध्ये ३२.८ मिमी, कराडमध्ये २६.१ मिमी, तर कोरेगावमध्ये ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसवड-खटाव तालुक्यात तब्बल ४९.३ मिमी आणि माण तालुक्यात ४७.५ मिमी पाऊस झाला. आश्चर्य म्हणजे महाबळेश्वरसारख्या नेहमी डबडबणाऱ्या पावसाळी भागाला मागे टाकत दुष्काळी माण-खटाव तालुक्यांत मुसळधार पावसाची नोंद केली आहे. महाबळेश्वरमध्ये ४१.५ मिमी, वाईमध्ये ४२.२, तर खंडाळा तालुक्यात २९.२ मिमी पाऊस पडला आहे.

जून ते सप्टेंबर या हंगामात जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८६६.२ मिमी असते. प्रत्यक्षात आत्ताच ८५१.५ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा थोडा कमी. मात्र, यामध्ये दुष्काळी तालुक्यातील पाऊसमान मात्र पुढे गेले आहे. माण तालुक्यात तब्बल १४९.५ टक्के, फलटण १२४.१५, वाई ११३ आणि महाबळेश्वरात ११४.१ टक्के पाऊस झाला आहे.