सीमेवर निकराची झुंज देऊन पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे उधळणाऱ्या लष्करातील तीन शूरवीर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचे भाग्य बुलढाणा जिल्ह्य़ाला लाभले आहे. शत्रूंचा खात्मा करून मातृभूमीचे रक्षण केल्याबद्दल ऑनररी कॅप्टन बाणा सिंह, सुभेदार योगेंद्रसिंह यादव व नायब सुभेदार संजय कुमार यांना परमवीर चक्र देऊन गौरविण्यात आले. या पराक्रमी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा उद्या गुरुवार, १६ जुलैला येथे सत्कार करण्यात येणार आहे.
जयस्तंभ चौकातील नागरी सत्कारानंतर सहकार विद्या मंदिरात प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहे. बुलढाण्याचे सुपुत्र व सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर यांच्या माध्यमातून बुलढाणेकर जनतेला या शूरवीरांचे साहसी आणि रोमांचकारी युध्दाचे प्रसंग ऐकता येणार आहेत. बुलढाणावासी व जिल्ह्य़ातील माजी सैनिक व कुटुंबीयांच्या वतीने हा सत्कार होत आहे.
या सत्कार समारंभाच्या आयोजनाबाबत सैनिक कल्याण कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे पाटील. सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कमांडर मिलिंदकुमार बडगे, निवृत्त कॅप्टन अशोक राऊत, शौर्यचक्रप्राप्त रमेश बाहेकर उपस्थित होते.
सत्कार समारंभासाठी नागरी सत्कार समिती स्थापन करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता आगमन झाल्यानंतर जयस्तंभ चौकात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. तेथून सहकार विद्या मंदिरापर्यंत तिन्ही शूरवीरांची मिरवणूक काढण्यात येईल. ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी राष्ट्रध्वज दाखवून परमवीरचक्रप्राप्त अधिकाऱ्यांचे स्वागत करतील. ऑनररी कॅप्टन बाणा सिंह हे जम्मू-काश्मीरमधील कडियालचे रहिवासी आहेत, तर सुभेदार योगेंद्रसिंग यादव उत्तर प्रदेशचे आणि नायब सुभेदार संजय कुमार हिमाचल प्रदेशचे आहेत. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, तसेच कर्नल सुहास जतकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीड हजार फूट बर्फाची चादर भेदली
ऑनररी कॅप्टन बाणा सिंह हे ६ जानेवारी १९६९ रोजी जम्मू-काश्मीर रेजिमेंटमध्ये भरती झाले. सैन्यात असताना जून १९८७ मध्ये २१ हजार फूट उंचावरील सियाचीन ग्लेशिअरमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून काबीज केलेले बंकर काबीज केले. विशेष म्हणजे, दोन्ही बाजूने उभेद्य दीड हजार फूट बर्फाची चादर होती. ती भेदून त्यांनी बंकरवर ताबा मिळविला. स्वत:च्या व सहकाऱ्यांच्या प्राणांची बाजी लावून आमनेसामने ग्रेनेड व बॉनेटच्या सहाय्याने लढाई केली व पाकिस्तानी शत्रूंना नेस्तनाबूत केले. या शौर्याबद्दल त्यांना परमवीरचक्र देऊन केंद्र सरकारने गौरविले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honouring indian army officers in buldhana