अलिबाग : माथेरान मधील घोड्यांना डोळ्यांचा विचित्र आजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. डोळ्यांना होणाऱ्या या संसर्गामुळे घोड्यांना अंधत्वाचा धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रायगडच्या पशुसंवर्धन विभागाने घोड्यांची तपासणी सुरू केली असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.गेल्या काही दिवसांपासून माथेरान मधील अनेक घोड्यांना डोळ्याचा संसर्ग होत होता. सुरवातील डोळ्यांना सुज येत होती. नंतर डोळ्यातून चिकटद्रव येण्यास सुरवात होत होती.
तीन ते चार दिवसांनी डोळ्यांचा रंग बदलले दिसत असून, घोड्यांची दृष्टी कमी झाल्याच्या समोर आले होते. घोड्यामधील या विचित्र आजारामुळे माथेरान मध्ये घबराटीचे वातावरण होते. प्राणी संघटनांनी ही बाब समोर आणल्यानंतर अलिबाग येथून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक माथेरान मध्ये दाखल झाले आहे, त्यांनी घोड्यांची तपासणी सुरू केली असून, डोळ्यांचा संसर्ग झालेल्या घोड्यांवर उपचार सुरू केले आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अश्वपालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
घोड्यांच्या डोळ्यातील चिकट द्रवाचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी मुंबई येथील पशुवैदयकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. त्याचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आजाराचे नेमके कारण समजू शकेल असे मत पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अजय कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. डोळ्याचा संसर्ग झालेले बहुतांश घोडे आता बरे झाले असून, सध्या दोन घोड्यामध्ये सध्या आजाराची लक्षणे दिसत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
माथेरानमधील दोन घोडयांमध्ये हा आजार दिसतो आहे. नेमका काय आजार आहे याचे निदान झालेले नाही. परंतु जी लक्षणे दिसताहेत त्यानुसार औषधोपचार सुरू आहे. आणि औषधोपचारांचा चांगला परीणाम दिसून येत आहे.डॉक्टरांचे पथक या घोडयांवर लक्ष ठेवून आहे.डॉ. सचिन देशपांडे, उपायुक्त पशुसंवर्धन