सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ याठिकाणी एका तरुणाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मोबाइलचा स्क्रीन लॉक काढून मागितल्याच्या कारणातून आरोपीनं पत्नीला अमानुष मारहाण केली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पीडित महिलेनं पतीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नामदेव हाक्के असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. तो आपल्या पत्नीसह कवठेमहांकाळ तालुक्यातील रायवाडी येथे वास्तव्याला आहे. घटनेच्या दिवशी नामदेव घरी उशिरा आला होता. यावेळी पत्नी गोकुळा यांनी एवढा उशीर कुठे होता? अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना आपण नागज येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेल्याचं पतीने सांगितलं. पण मध्यरात्री बाराच्या सुमारास फोन केला असता तुमचा फोन व्यस्त लागत होता. तुम्ही कुणाशी बोलत होता, असा जाब पत्नीनं विचारला.
यानंतर दोघांतील वाद वाढत गेला. तुम्ही मध्यरात्रीपर्यंत मोबाइलवर कुणाशी बोलत होता, हे मला पाहायचं आहे. मला तुमच्या मोबाइलचा लॉक काढून द्या, अशी मागणी पत्नीने केली. यानंतर संतापलेल्या पतीने मध्यरात्रीच आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे. आरोपीनं लाथाबुक्क्यांसह औषध पंपाच्या गनने देखील मारहाण केली आहे. याप्रकरणी गोकुळा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
