धवल कुलकर्णी

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सध्या पक्षातच राहणार आहे हे स्पष्ट केलं आहे. गोपीनाथगडावरुन त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतची खदखद बोलून दाखवली होती. तसंच पंकजा मुंडे या भाजपातच असतील मात्र माझं काही खरं नाही असं ते म्हणाले होते. त्यामुळे एकनाथ खडसे वेगळा विचार करणार का? अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चांना त्यांनी तूर्तास तरी पूर्णविराम दिला आहे.

“मी सध्या पक्षातच राहणार आहे… कुठलाही राजकीय निर्णय घेतला तर तुमच्या समोर येऊन जाहीर करेन,” असे खडसे यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितले.

मागच्या आठवड्यात परळी येथील गोपीनाथ गडावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात खडसे यांनी त्यांच्या मनातली अस्वस्थता उघड केली होती. आज पक्षात असतो तरीसुद्धा माझा भरवसा धरू नका असे त्यांनी सांगितले होते. खडसे यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या जोरदार वावड्या उठू लागल्या होत्या.

२००९ ते २०१४ या कालखंडामध्ये एकनाथ खडसे हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर मात्र तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यावेळी एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र नाथाभाऊंना डावलण्यात आलं. तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीला सुरुवात झाली.

नाथाभाऊंनी  फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महसूल व अन्य काही ही महत्त्वाचा त्याच्या खात्यांचा भार सांभाळत होते. तरीही त्यांची मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा लपून राहिली नव्हती. अचानक २०१६ मध्ये खडसे वर आरोप करण्यात आले, उदाहरणार्थ कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या पत्नीशी झालेले  संभाषण व भोसरी येथील जमीन खरेदी गैरव्यवहार वगैरे. या वादंगानंतर खडसेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्या नेत्याचे मंत्रिमंडळात लवकरच पुनरागमन होईल अशी अपेक्षा असलेल्या त्यांच्या समर्थकांना नंतरच्या काळात जबरदस्त धक्का बसला. तत्कालीन फडणवीस सरकार मधल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले तरी राजीनामा द्यावा लागणारे खडसे हे पहिले आणि एकमेव हे विशेष…

अलीकडे झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खडसेंना त्यांच्या परंपरागत मुक्ताईनगर मतदार संघटना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर यांना तिकीट देण्यात आले होते. पण शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी यांचा अगदी निसटत्या मतांनी पराभव केला. हा पराभव प्रचंड जिव्हारी लागलेल्या नाथाभाऊंनी याचे खापर आपल्या पक्षांतर्गत विरोधकांवर फोडले. भाजपाची निवडणुकीच्या काळात झालेली घसरण ही बहुजन समाजाच्या नेत्यांना डावलल्यामुळे झाली असा थेट आरोप त्यांनी केला होता.