भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपात परतणार आहेत. याबाबत त्यांनीच माध्यमांसमोर खुलासा केला. भाजपा हे माझं घर असल्याने पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, त्यांनी शरद पवारांचेही आभार मानले आहेत. आज माध्यमांशी बोलताना शरद पवारांचे आपल्यावर ऋण आहेत, असं म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ खडसे म्हणाले, “माझ्या संकटाच्या काळात मला शरद पवारांनी साथ दिली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पण मी आता भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”

भाजपा प्रवेशाबाबत काय म्हणाले?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांची मी भेट घेतली आणि भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे भाजपात मी प्रवेश करणार आहे. आणि येत्या १५ दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, असा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत माझा प्रवेश नाही. कारण, माझा प्रवेश दिल्लीत होणार आहे. ज्या दिवशी तारीख मिळेल ज्या दिवशी मला बोलावणं येईल त्या दिवशी मी प्रवेश करेन, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“भाजपाच्या जडणघडणीत माझं योगदान राहिलं आहे. गेले अनेक वर्षे मी या घरात राहिलो आहे. ४० वर्षे त्या घरात राहिल्याने पक्षाविषयी लगाव होता. पण नाराजी असल्याने मी बाहेर पडलो. परंतु, आता नाराजीची तीव्रता कमी झाल्याने मी पुन्हा पक्षात येत आहे”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

भारतीय जनता पक्षाशी ३० हून अधिक वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं. तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली. बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली. त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुतीकडून रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली असून महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरायचा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am indebted to sharad pawar during the time of crisis i the statement of eknath khadse who is returning to bjp is in discussion sgk