अलिबाग– अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड मधील शेतकऱ्यांनी प्रशासनाने शेवटचा अल्टीमेटम दिला आहे. प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी समंतीने जागा देण्याची २९ ऑगस्ट ही शेवटची मुदत असणार आहे. त्यानंतर सक्तीने भूसंपादनाची प्रक्रीया सुरु होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड औद्योगिक वसाहतीमध्ये सिनारमन्स कंपनीचा आशिया खंडातील सर्वात मोठा पेपर उद्योग प्रकल्प येऊ घातला आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वी टाटा कंपनीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी संपादीत केली जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सिनारमन्स कंपनी आणि राज्यसरकारमध्ये सामजस्य करारही झाला आहे. मात्र या औद्योगिक क्षेत्रासाठी शहाबाज येथील पोहोच रस्ता एकूण ८.५५ हेक्टर क्षेत्र संपादीत केले जाणार आहे.

उच्चाधिकार समितीने या भुसंपादनासाठी प्रतिएकरी ९६ लाख ६९ हजार ५५४ रुपये म्हणजेच एका हेक्टरसाठी २ कोटी ४१ लाख ७३ हजार रुपये येवढा दर निश्चित केला आहे. संमती कराराव्दारे भूसंपादन करून, ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम ३३(३) च्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, ३१ जुलै पर्यंत उपविभागीय कार्यालयाकडे करारपत्र सादर करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी करार पत्र प्रांताधिकारी कार्यालायात दाखल केली होती. संपतीपत्र दाखल केलेल्या शेतकऱ्यांना आरटीजीएस प्रणालीव्दारे मोबदला वितरण सुरू करण्यात आले होते. मात्र वाढीव मोबदल्याची मागणी करत अनेक शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध केला होता. मात्र आता शेतकऱ्यांना संमतीपत्र दाखल करण्याची शेवटची संधी प्रशासनाने दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी करारपत्र सादर केलेले, नाही त्यांनी समक्ष उपस्थित राहून संमती करारपत्र दाखल करण्यास सागण्यात आले आहे. हे संमतीपत्र दाखल करण्यासाठी २९ ऑगस्ट ही अंतिम मुदत असणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी दिली आहे. यानंतर सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

करारपत्र सादर करण्याची मुदत संपुष्टात आली असली तरी ज्या खातेदारांना उच्चाधिकार समितीने मंजुरी दिलेला दर मान्य असेल त्यांनी आपले संमती करारपत्र उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टया वगळून ) समक्ष उपस्थित राहून दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत सादर करावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.