कराड: मद्यपी दोघा परप्रांतीय तरुणांच्या भांडणात शिव्या दिल्याच्या रागातून एकाचा दांडक्याने झालेल्या मारहाणीत निर्घृण खून झाल्याची घटना कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे रात्रीच्या सुमारास घडली. राजपाल नारायण पटेल (वय २६, रा. ऊराईकच्छाल, ता. लोरमी, जि. मुगेली- छत्तीसगड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजय भागवत पटेल ( रा. ऊराईकच्छाल, ता. लोरमी, जि. मुगेली- छत्तीसगड, सध्या रा. भोसलेवाडी, ता. कराड )असे या खुनाच्या आरोपाखालील तरुणाचे नाव आहे.

भोसलेवाडी येथील जुन्या गावठाणालगत बांधकाम केलेल्या खोल्यांमध्ये छत्तीसगढ राज्यातील कामगार वास्तव्यास आहेत. त्यातील अजय भागवत पटेल व राजपाल नारायण पाटील या दोघा सहकाऱ्यात दारूच्या नशेत वाद सुरू झाला. या वेळी शिव्या दिल्याच्या रागातून अजय पटेल याने राजपाल यास लाकडी दांडक्याने डोक्यात, डोळ्यावर, पाठीवर गंभीर मारहाण करीत त्याचा जागीच जीव घेतला.

हेही वाचा : मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात गुप्त बैठक झाल्याचा दावा; एकनाथ शिंदे म्हणाले…

हा खुनाचा प्रकार घडत असताना फिर्यादी रवींद्रकुमार रमेशीलाल पटेल (वय ३०, रा. छत्तीसगड, सध्या रा. भोसलेवाडी) हा तेथे आला असता मारेकऱ्याने फिर्यादीच्या अंगावर काठी उगारून “‘मै राजपाल को मार डालूंगा, तु पोलीस केस कर, या कुछ भी करो, तुमने किसी को बताया तो तुम्हे भी मार डालुंगा” असे धमकावले. दरम्यान, रवींद्रकुमार पटेल याच्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.