राहाता: सायबर भामट्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे आश्वी परिसरात उघडकीस आले आहे. आश्वी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, मात्र त्यांनी अहिल्यानगर येथे जाऊन सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.
सायबर भामट्यांच्या सापळ्यात आश्वीतील एक औषध विक्रेता अडकला. त्याने माणुसकीतून ४ हजार ५०० रुपये ऑनलाइन पाठविले. पण नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आश्वी परिसरातील उर्वरित पाच वैद्यकीय व्यावसायिक व एका प्रतिष्ठिताने वेळीच हा प्रकार ओळखल्याने त्यांची फसवणूक टळली.
वैद्यकीय व्यावसायिकाने माणुसकीच्या भावनेतून स्वतःकडे पैसे नसतानाही दुसऱ्याकडून उधार घेऊन संबंधित क्यूआर कोडवर साडेचार हजार रुपयांची रक्कम पाठवली. परंतु नंतर फसवणुकीचा संशय आल्याने इतरांनी तत्परता दाखवत माहिती पडताळली. त्यामुळे त्यांची मोठी फसवणूक टळली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर असल्याचे भासून ही फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
याआधीही जून महिन्यात सायबर भामट्यांनी ग्राहक सेवा केंद्र चालकाची १८ हजार रुपयांची फसवणूक केली होती. आश्वी खुर्द येथे पोलीस असल्याचे भासवून एका व्यक्तीकडून पैसे व सोन्याची अंगठी उकळली होती. या दोन्ही घटनांत महिलांच्या नावाने क्यूआर कोड वापरण्यात आल्याचे आढळले. संबंधित व्यावसायिक आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता येथे यासंदर्भात तक्रार घेतली जात नाही. तुम्ही अहिल्यानगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा असा सल्ला दिला. त्यामुळे याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
पोलिसांनी तातडीने कारवाई करावी
आता डॉक्टरांच्या नावाने लोकांना फसवले जात आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिक, दुकानदार, सामान्य नागरिक या सर्वांनी सावध राहिले पाहिजे. पोलिसांनी या सायबर भामट्यांचा तातडीने शोध घ्यावा. अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका. क्यूआर कोड किंवा लिंकवरून पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा. शंका आल्यास तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर व स्थानिक पोलिसांत संपर्क साधा. ही घटना फक्त पैशांची नाही, तर आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारी आहे. -संजय गायकवाड, माजी उपसरपंच, आश्वी खुर्द.