सांगली: जत नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित भाजपचाच माजी नगरसेवक उमेश जयसिंग सावंत (वय ४२, रा. सावंत गल्ली, जत) हा बुधवारी सांगली येथील जिल्हा न्यायालयात शरण आला. खुनाच्या या घटनेनंतर तब्बल १४ महिने उमेश सावंत सांगली जिल्हा पोलिस दलाला गुंगारा देत फरार होता.

जत- शेगाव रस्त्यावरील शाळेत शिकत असलेल्या मुलांना घेण्यासाठी विजय ताड दि. १७ मार्च २०२३ रोजी निघाले होते. याचवेळी संदीप ऊर्फ बबलू शंकर चव्हाण व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून व डोक्यात दगड घालून विजय ताड यांचा खून केला होता. या राजकीय खुनाच्या घटनेने अवघा सांगली जिल्हा हादरुन गेला होता.

हेही वाचा : ….अन् राजवीचा तिसरा वाढदिवस अखेरचा ठरला

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका पोलिस पथकाने या खून प्रकरणी संदीप ऊर्फ बबलू शंकर चव्हाण याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांना गोकाक (कर्नाटक) येथून अटक केली होती. या चौघानीही उमेश सावंत याच्या सांगण्यावरुन विजय ताड यांचा खून केल्याची कबुली दिली होती.

हेही वाचा : धाराशिव : आमरसातून पतीला दिल्या गुंगीच्या गोळ्या, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील प्रकार; पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

खुनाच्या या घटनेनंतर उमेश सावंत हा फरारी झाला होता. उमेश सावंत याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह जत पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. तब्बल १४ महिने सांगली पोलिसांना गुंगारा देण्यात उमेश सावंत यशस्वी ठरला होता. या काळात उमेश सावंत याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र उमेश सावंत याचा जामीन अर्ज फेटाळला गेला होता. अखेर आज उमेश सावंत हा येथील जिल्हा न्यायालयात शरण आला. जिल्हा न्यायालयाने उमेश सावंत याची रवानगी सांगली जिल्हा कारागृहात केली आहे.