सांगली : रानवस्तीवर गोठ्यात बांधलेल्या संकरित गायींची चोरी करणारी सहा जणांची टोळी मिरज ग्रामीण पोलीसांनी गजाआड केली असून त्यांच्याकडून बेडग परिसरात चोरीस गेलेल्या सहा दुभत्या गायी हस्तगत करण्यात यश आले आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.
दिवाळी नंतर बेडग, आरग, मालगाव परिसरातील रानवस्तीवर गोठ्यातून संकरित दुभत्या गायींची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या चोरीचा तपास करीत असताना गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या कर्मचार्यांना या गायींची चोरी करून कमी किंमतीत या गायींची विक्री नरवाड, सांगोला, कर्नाटकातील सीमावर्ती गावात केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पडताळणी केली असता म्हैसाळमध्ये संकरित गाय नव्याने खरेदी केली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या गायीच्या खरेदीबाबत चौकशी केली असता या चोरीचा उलगडा झाला.
हेही वाचा : “हमारे दुःख पर मीठ क्यूँ चोळते हो?” म्हणत छगन भुजबळांनी केली मनोज जरांगे पाटील यांची नक्कल
या प्रकरणी प्रतिक कोळी (वय २१, बेडग), राकेश शिंदे (वय २४, म्हैसाळ), आकाश उर्फ बापू मासाळ (वय २३, बेडग), प्रकाश उर्फ बापान्ना मासाळ (वय २४, बेडग), किशोर उर्फ अण्णा शेळके (वय २३, बेडग) आणि राकेश आवळे (वय ३१, म्हैसाळ) या सहा जणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सहा संकरित दुभत्या गायी, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला लहान टेम्पो (एमएच १० सीआर ०५८२) हस्तगत करण्यात आला आहे.