आज इंदापूरमध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यात जोरदार भाषण केलं. तसंच आपल्या भाषणात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. आमचा विरोध मराठा समाजाला नाही. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमचीही भूमिका आहे. मात्र आमचा विरोध दादागिरी आणि झुंडशाहीला आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांची नक्कल करत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
“नारायण कुचे म्हणून आमदार आहेत. त्यांच्या शारिरीक व्यंगावर या मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. कुणाच्याही शारीरीक व्यंगावर टीका करु नये. एक पत्रकार त्यांच्याकडे जरांगेंकडे केले. त्यांना प्रश्न विचारला वो खासदार प्रताप चिखलीकर है उनके कारपर हमला हो गया..यावर प्रश्न विचारला. त्यावर हा जरांगे म्हणतो, ते काय राष्ट्रपती हाय काय ?, कायको गया हमारें गांवमें? घरमें झोपने का ना गपचिप. डोकेको तान दे रहा है उगाच के उगाच. हमने बोला ना हमारे गावमें मत आओ तर आनेकाच नहीं ना. तुम यहां पे काड्या लावने को आते ना? सरकारने सुपारी दी है ना? कायदा सुव्यस्था बिघाडो, आना है तो आरक्षण लेकर आओ. हिकडं येऊन का हून बोलता तुम्ही? हमारे दुखःपर मीठ चोळ रहे हों तुम? काय याची अक्कल. हा तर अकलेने दिव्यांग झाला आहे. याला हिंदीही येत नाही.”
लोक या जरांगेला का घाबरतात?
“लोक तरी मनोज जरांगेला का घाबरतात? त्यादिवशी जालन्याला त्याची सभा होती. जालन्यात शाळेला सुट्टी जाहीर झाली होती. आरडाओरडा झाला त्यानंतर सुट्टी रद्द झाली. मी सरकारी अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही पोलीस असा, अधिकारी असा, सरकारच्या कुठल्याही खात्याचे असा तुम्ही त्रयस्थपणे या गोष्टीने पाहायचं आहे. तुम्ही भेदभाव करता कामा नये.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मी तलवारींची आणि धमक्यांची भाषा करत नाही
“मी काय तलवारींची भाषा केली आहे का? ती भाषा त्याने केली. २४ तारखेनंतर तुला दाखवतो, तुझा हिशेब करतो हे कोण बोललं? आमचा विरोध मराठ्यांना नाही. आमचा विरोध झुंडशाहीला आहे. दादागिरी केली तर दादागिरीनेच उत्तर देऊ. त्यानंतर आमच्यावर जबाबदारी टाकू नका असंही भुजबळ म्हणाले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये एवढीच मागणी आम्ही करतो आहोत. त्यात काय चुकीचं आहे? असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.”