सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह, शहरात गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराजवळील हिप्परगा तलाव शंभर टक्के भरून वाहू लागला आहे. त्यामुळे तलावाच्या दोन्ही सांडव्यातून ११०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. यात बक्षी हिप्परगे गावातील ओढा फुटल्याने या परिसरातील एक हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. दुसरीकडे आदिला नदी व नजीकच्या नाल्यात आलेले पाणी शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये शिरले असून, एक लाख लोकसंख्या यामुळे बाधित झाली आहे.

दरम्यान, आज पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पूरस्थिती लवकरच निवळण्याची शक्यता आहे. काल सोलापूर ते तुळजापूर महामार्गावर आलेले पाणीही आज निवळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कालपासून शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन जलद प्रणालीने बाधित लोकांना मदत केली. पाण्याखाली गेलेले रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सोलापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी ब्रिटिशकालीन खोदलेला हिप्परगा तलाव शहराला खेटून आहे. सुमारे अडीच टीएमसी क्षमतेचा हा तलाव यंदा पूर्ण भरला आहे. त्यामुळे दोन्ही सांडव्यातून सुमारे अकराशे क्युसेक पाणी सोडले जात आहे. हे पाणी आदिला नदी आणि ओढ्यातून वाहते. मात्र, तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नदीसह या ओढ्यास पूर आल्याने काठच्या वसंत विहार, गणेश नगर, मडकी वस्ती, यश नगर, बनशेट्टी वस्ती आदी भागांत हे पाणी शिरले आहे. याच भागात रेल्वे अंडरपूलमध्ये काल निम्म्यापेक्षा अधिक पाणी वाहत होते. ते आता कमी झाले आहे. सोलापूर ते तुळजापूर महामार्गावर आलेले पाणीही आज निवळण्यास सुरुवात झाली आहे.

शेतीला फटका

बक्षी हिप्परगा परिसरात दोन-चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथील ओढा फुटला आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील मिळून सुमारे एक हजार हेक्टर उडीद, तूर, मूग, बाजरी आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. एवढेच नव्हे तर शेतातील मातीही मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. महिला शेतकरी अनुराधा माळी यांची अडीच एकर शेतजमीन लागवडीखाली होती ती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मातीही वाहून गेली आहे. गावचे सरपंच अमोल महाडिक यांनी संपूर्ण गावातील नुकसानीचा पाढा वाचून दाखविला. त्याचबरोबर शासनाकडून पंचनामे, तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याबाबत अद्याप प्रशासन व लोकप्रतिनिधी कोणीही पाहणी करण्यासाठी आले नाहीत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.