सोलापूर : मराठी भाषा आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघेही बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर इकडे सोलापुरात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. शिवसेना ठाकरे गट समन्वयक प्रा. अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यांच्यात गळाभेट झाली.
प्रा. दासरी यांनी, आमचा महाराष्ट्र धर्म हाच झेंडा आणि अजेंडा आहे, महाराष्ट्राची ओळख जपणे, मराठी माणसाचा हक्क प्रस्थापित करणे आणि येणाऱ्या काळात सामाजिक व सांस्कृतिक मुद्यांवर एकत्र लढण्याचा निर्धार केल्याचे सांगितले.
या संयुक्त बैठकीस मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, जयवंत कोकाटे, संतोषकुमार घोडके, प्रकाश कोळी, जितेंद्र टेंभुर्णीकर आदींनी हजेरी लावली होती. तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हा संघटक शरणराज केंगनाळकर, शशिकांत बिराजदार, नागेश सोलनकर, अंबादास चव्हाण हे उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थानिक रोजगार, शिक्षण, संस्कृती आणि भाषेच्या रक्षणासाठी दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, महाराष्ट्र धर्म हेच एकमेव ध्येय असावे, अशी भूमिका दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. पुढील काळात संयुक्त रचनात्मक उपक्रमासह संघर्षात्मक आंदोलन करण्याचे संकेतही देण्यात आले.