कर्जत : आंदोलनाला पाठिंबा देताना कर्जत शहराची बाजारपेठ दुपारी १२ पर्यंतच बंद ठेवली जाईल. दुपारी १२ नंतर बाजारपेठ सुरू राहील, असा निर्णय कर्जत शहर व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष बिभीषण खोसे पाटील यांनी ही माहिती दिली. विविध राजकीय पक्ष, संघटना यांच्याकडून लागोपाठ पुकारल्या जाणाऱ्या बंदमुळे शहरातील व्यापारावर विपरीत परिणाम झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेची बैठक बिभीषण खोसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी संघटनेचे पदाधिकारी महावीर बोरा, प्रसाद शहा, संतोष भंडारी, संजय लाळगे, किशोर बोत्रा, गणेश जेवरे, अनिल भैलुमे, सुरेश नहार, योगेश जाधव, योगेश भापकर, सचिन कुलथे, संजय काकडे, गणेश तोरडमल, संदीप गदादे, विशाल छाजेड, श्रीकांत तोरडमल, नितीन देशमुख, एहरार सय्यद, अनिल भैलुमे, हनुमंत भोंगे, यशवंत थोरात, राम ढेरे, दीपाली तोडकर आदी उपस्थित होते.

या संदर्भात माहिती देताना खोसे पाटील यांनी सांगितले, की कर्जतची बाजारपेठ नेहमीच दुष्काळग्रस्त व दुर्लक्षित राहिली आहे. येथील व्यापाऱ्यांनी मोठ्या कष्टाने बाजारपेठेला नवसंजीवनी दिली. बाहेरील व्यापारी येऊ लागले, उलाढाल वाढली, कर्जत आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ लागले; मात्र सततच्या बंदमुळे बाजारपेठ पुन्हा संकटात सापडली आहे. रोज लाखो रुपयांचे नुकसान होते, ते कोण भरून काढणार? आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांनी कधी व्यापाऱ्यांच्या हतबलतेकडे डोळे उघडून पाहिले आहे का? त्यामुळे आम्ही दुपारी १२ पर्यंत दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देऊ. दुपारी १२ नंतर बाजारपेठ सुरू राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आंदोलनाला मान्यता व व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार नाही, हे दोन्ही हेतू साध्य होतील. राजकीय पक्ष व संघटनांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आम्ही आंदोलन करताना सोबत आहोत; परंतु आमच्या घरातील चुली विझवू नका, असेही आवाहन त्यांनी केले.केवळ कर्जतच नव्हे तर इतरही शहरातून हा प्रश्न ज्वलंत झालेला आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून वारंवार पुकारल्या जाणाऱ्या बंदमुळे बाजारपेठांच्या व्यवहारावर परिणाम होत आहेत. शेतकऱ्यांनाही शेतीमाल विक्रीसाठी आणताना अडचणी जाणवतात. अनेकदा बंद ऐनवेळी पुकारले जातात. त्यावेळी हे परिणाम अधिक गंभीर स्वरूपाचे असतात. कर्जत व्यापारी संघटनेने या प्रश्नाला वाचा फोडल्याचे मानले जाते.