लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सार्वजनिक उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी कायदेशीर पाऊल उचलले असताना त्याला छेद देण्याचे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे आक्षेपार्ह कृत्य त्यांच्याच पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस शिपायाने केल्याचे उजेडात आले आहे. त्याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी त्या पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित केले आहे.

काशीनाथ विष्णुपंत गाडेकर (नेमणूक शहर पोलीस मुख्यालय) असे निलंबित पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यावर तीन आक्षेपार्ह कृत्यांबद्दलचा ठपका ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा-अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीसह लाखाचा दंड

पोलीस मुख्यालयासमोर सार्वजनिक चौकात शिवराम प्रतिष्ठान नावाचे मंडळ आहे. पोलीस,शिपाई वाडेकर याने तेथील रहिवासी आणि राजकीय कार्यकर्त्यांना एकत्र आणून महापालिका आणि अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेची परवानगी न घेता शिवराम प्रतिष्ठानच्या नावाचा फलक बेकायदेशीरपणे लावल्याचे चौकशीत दिसून आले. याशिवाय दि. २ जून २०२२ रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू साम्राज्यदिनानिमित्त पालखी मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकीच्यावेळी बंदोबस्तासाठी पोलीस शिपाई वाडेकर याची नेमणूक नसताना तो पालखी मिरवणुकीत सामील झाला आणि लेझीम खेळल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-सांगोल्याजवळ घरात वृद्ध दाम्पत्याची हत्या

त्यानंतर गेल्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत एका मंडळाने ध्वनिप्रदूषण केल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाद्यांचा आवाज कमी करण्याच्या सूचना दिली असता पोलीस शिपाई वाडेकर याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या विरोधात चिथावणी देऊन, काहीही होत नाही, वाद्यांचा आवाज असाच ठेवायला हवा. नाही तर मिरवणूक पुढे न जाऊ द्यायची नाही, असे म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या विरोधात जागेवर ठिय्या मारण्यासाठी भडकावले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस खात्यात सेवेत असूनही खात्याची शिस्त न पाळता उलट पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका पोलीस शिपाई वाडेकरवर ठेवण्यात आला आहे.