औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, तसेच वीज दरांतील असमानतेने नाराजी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्योगांमधील मरगळीचा विविध शहरांमध्ये सत्ताधारी पक्षाला फटका बसला. काही ठिकाणी जागा गमवाव्या लागल्या, तर काही मतदारसंघांमध्ये मताधिक्य कमी झाले. वाढती बेरोजगारी, केंद्राची धोरणे यातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजी मतदानातून दिसली.
भिवंडी व इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग बंद पडले. यातून कामगारांचे स्थलांतर झाले. भिवंडीत एक जागा, तर इचलकरंजीची जागा सत्ताधारी युतीला गमवाव्या लागल्या. कोल्हापूरमध्ये भाजप तसेच सत्तेतील भागीदार शिवसेनेच्या विरोधात मतदारांची नाराजी बघायला मिळाली. नाशिकमध्ये भाजपने जागा कायम राखल्या असल्या तरी मताधिक्य घटले. या तुलनेत पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद पट्टय़ात तेवढा फटका सत्ताधाऱ्यांना बसलेला नाही. औद्योगिक पट्टय़ातील निकाल सत्ताधाऱ्यांसाठी चिंताजनक आहेत.
कोल्हापूरमध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्य़ात इंजिनीअरिंग -फौंड्री, वस्त्रोद्योग उद्योगातील प्रदीर्घ काळाची मंदी, त्यातून उद्योग क्षेत्राचा घसरणीला लागलेला आलेख, औद्योगिक पातळीवर गंभीर बनलेले प्रश्न याचा फटका या वेळच्या विधानसभा निवडणुकीत बसला. तीन मतदारसंघांत नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे उद्योजक आहेत. यामुळे आता तरी उद्योगाचे प्रश्न मार्गी लागतील, असा आशावाद उद्योजकांमध्ये आहे. औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधांचे प्रश्न, मंदी, जीएसटीमधील अडचणी, महापुरात झालेले सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याने त्याची भरपाई, वीज दरातील प्रादेशिक असमानता आदी कारणांमुळे या क्षेत्रात मरगळ आहे. याचा परिणाम म्हणून शेकडो उद्योजक कर्नाटकात उद्योग हलवण्याच्या विचारात असून कर्नाटकने त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला आहे. इतके प्रश्न जटिल झाले असताना शासन पातळीवर प्रयत्न करून काही दिलासा आमदारांनी मिळवून द्यावा, अशी अपेक्षा उद्य्ोजक करीत होते; पण प्रतिसाद मिळाला नाही, अशी उद्योजकांची तक्रार आहे. याच वेळी प्रत्यक्ष उद्योगात असलेले चंद्रकांत जाधव व ऋतुराज पाटील यांना कोल्हापुरातून निवडून दिले.
वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये हीच आवृत्ती दिसून आली. विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर यांना यंत्रमाग व्यावसायिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ५० हजार माग भंगारात विकले गेले. एक लाखांपैकी निम्मे माग रात्रपाळी सुरू राहिली. अर्थकारण बिघडल्याने वस्त्रोद्योजकांनी मतातून उद्रेक व्यक्त करीत हाळवणकर यांचा ५० हजार मतांनी पराभव करीत पुन्हा आमदारकीची सूत्रे माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडे सोपवली आहेत. याशिवाय, औद्योगिक वसाहत, चांदी उद्योग याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका हातकणगले मतदारसंघाचे आमदार सुजित मिणचेकर यांना बसला.
नाराजीमुळे नाशिकमध्ये भाजपची दमछाक
नाशिक : वाहन उद्योगावरील मंदीचे मळभ, लहान-मोठय़ा कारखान्यांमध्ये सक्तीने दिली जाणारी सुट्टी, हजारो कंत्राटी कामगारांना गमवावा लागलेला रोजगार याचा विपरीत परिणाम कामगारबहुल वसाहतीच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या निकालावर झाल्याचे अधोरेखित झाले. ही जागा भाजपने थोडक्यात राखली. पक्षाच्या उमेदवार सीमा हिरे यांना विजयासाठी तिष्ठत राहावे लागले. गेल्या वेळच्या तुलनेत त्यांच्या मताधिक्यात २० हजारांनी घट झाली आहे. महागडी वीज, वाढीव करांचा बोजा, जमिनीचे दर यामुळे पिचलेले उद्योग मंदीला तोंड देत आहेत. स्थानिक पातळीवर महिंद्रा, बॉश, क्रॉम्प्टन, सिएट टायरसारखे मुख्यत्वे वाहन, इलेक्ट्रिकशी संबंधित उद्योग आहेत. वाहनांची मागणी ओसरल्याने कारखान्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना वारंवार सक्तीची सुट्टी द्यावी लागते. लहान-मोठय़ा उद्योगांनी हजारो कंत्राटी कामगारांना कमी केले आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग हा मुख्यत्वे नाशिक पश्चिम या मतदारसंघात वास्तव्यास आहे. शेकडो कामगार कुटुंबांना मंदीची झळ बसत आहे. कामगार वर्गातील नाराजीचा काही अंशी फटका भाजपच्या सीमा हिरे यांना बसला.
शासन, लोकप्रतिनिधींकडे फेऱ्या मारूनही एकही प्रश्न सुटला नसल्याने उद्य्ोजक, व्यापाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये दोन्ही आमदारांना पराभूत करून राग व्यक्त केला आहे.
संजय शेटे , चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष