सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये रविवारी झालेली शाईफेक आणि धक्काबुक्की प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांच्यासह सातजणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन नंतर चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडून देण्यात आल्याची माहिती अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय यामावार यांनी दिली.

अक्कलकोटमध्ये काल एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गायकवाड येत असताना कार्यक्रमस्थळापासून काही अंतरावर त्यांना शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष काटे व इतरांनी अडविले. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावातील छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तसेच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांबाबत यापूर्वी झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांना काळे फासण्यात आले.

हा निषेध करताना संघटनेच्या नावात बदल करण्याची मागणी करत धक्काबुक्की केली. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यामावार यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकाराशी संबंधित दीपक काटे व अन्य सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

परंतु, गुन्ह्याचा प्रकार हा जामीनपात्र असल्यामुळे काटे यांच्यासह सर्व आरोपींना चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडून देण्यात आले. या हल्ल्यात काहीजण जखमी झाले असून, त्यांच्यावरील हल्ल्याचे स्वरूप आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्ह्यात आवश्यक ते बदल केले जातील, असेही यामावार यांनी स्पष्ट केले.