पक्षांतर्गत फाटाफुट धनंजय मुंडे यांच्या पथ्यावर
राष्ट्रवादीत जिल्ह्यतून प्रदेशस्तरावर काम करणाऱ्या माजी मंत्री सुरेश धस व जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट व अप्रत्यक्ष भाजपला मदत केल्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. पक्षांतर्गत नेतृत्वाच्या गटबाजीतून धनंजय मुंडे यांना राजकीय धक्का बसला असला तरी पक्षाचे दोन प्रमुख नेते पक्ष प्रक्रियेतून बाजूला गेल्याने जिल्हाभर नेतृत्व विस्ताराची संधी धनंजय यांना चालून आली आहे. वरकरणी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीत फाटाफूट करून जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली असली तरी याचा अप्रत्यक्ष फायदा धनंजय मुंडे यांना झाला असून, आता नेतृत्वाने जिल्ह्यची सूत्रे धनंजय यांच्याकडे दिली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सर्वच मतदारसंघांत धनंजय यांचा प्रभाव राहील, असे मानले जात आहे.
बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी उघड, तर जयदत्त क्षीरसागर यांनी अप्रत्यक्ष भाजपला मदत केल्याने पक्षाने धस यांना सहा वर्षांसाठी निलंबित, तर क्षीरसागरांना प्रक्रियेतून बाजूला करत बंडखोर पुतणे संदीप क्षीरसागरांना जवळ केले. प्रदेशस्तरावर पक्षात नेतृत्व करणारे दोन दिग्गज नेते बाजूला गेल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जिल्हाभर नेतृत्व विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभेच्या सहाही मतदारसंघांतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कोणाचाच हस्तक्षेप सहन करत नसल्याने पक्षाला जिल्ह्यात नेतृत्वाचा चेहरा नाही. पाच वर्षे जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे पालकमंत्रिपद होते. तरी पक्षपातळीवर मात्र त्यांना एकाच मतदारसंघापुरते मर्यादित केले होते. पक्षांतर्गत गेवराईत आमदार अमरसिंह पंडित, माजलगावमध्ये प्रकाश सोळंके, केजमध्ये दिवंगत विमल मुंदडा यांचे पुत्र अक्षय मुंदडा, आष्टीत सुरेश धस, परळीत धनंजय मुंडे या नेत्यांचे मतदारसंघ हे स्वतंत्र संस्थाने मानली जातात.
अडीच वर्षांपूर्वी पक्षात नव्याने आलेल्या धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. धनंजय यांनी अभ्यासू आणि आक्रमक भाषणशैलीने राज्यभर आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. गर्दी खेचणारा तरुण नेता अशी प्रतिमा निर्माण झाली. पण जिल्हास्तरावरील नेत्यांना हा निर्णय रुचला नसल्याने त्यांचा साधा सत्कारही केला नाही. उलट परळी मतदारसंघाच्या बाहेर त्यांना अघोषित प्रवेशबंदीच होती. अजित पवार यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिषदेतही त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे धनंजय यांचा दौराही लातूर ते परळी असाच राहिला. जिल्ह्यतील नेत्यांची एकूण मानसिकता लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. दोन वर्षांत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवला. त्या वेळी पक्षाच्या इतर नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातच पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेत धनंजय यांचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने सत्तास्थापनेची सूत्रे त्यांच्याकडे आली. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीतून आष्टीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी थेट बंड करत पाच सदस्यांचा भाजपला उघड पाठिंबा दिला. तर जयदत्त क्षीरसागर समर्थक एक सदस्य गरहजर राहिल्याने राष्ट्रवादीचा पराभव झाला. अक्षय मुंदडा यांचे दोन सदस्यही भाजपच्या संपर्कात होते. पण ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीलाच मतदान केले. पक्षांतर्गत नेत्यांनीच पक्षाची सत्ता घालवल्याने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर आणि अक्षय मुंदडा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. पक्षाने अखेर धस यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. तर क्षीरसागरांना प्रक्रियेतून बाजूला करत त्यांचे बंडखोर पुतणे संदीप यांना पक्षाबरोबर घेतले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी फोडून जिल्हा परिषदेची सत्ता मिळवत धनंजय यांना धक्का दिला असला तरी पक्षांतर्गत पातळीवर मात्र धनंजय यांचा फायदाच झाला. माजी मंत्री प्रकाश सोळंके आणि आमदार अमरसिंह पंडित हे धनंजय समर्थक आहेत. धस यांच्या निलंबनानंतर आष्टीत आणि बीडमध्ये धनंजय यांनी संपर्क वाढवला आहे. जिल्हास्तरावर धनंजय यांच्या राजकीय उंचीचा दुसरा नेता नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्याकडे आली. बीड राष्ट्रवादी भवनात आता महिन्यातून काही दिवस धनंजय यांचा वावर राहणार असून, प्रत्येक मतदारसंघात ते फिरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मानणाऱ्या एकगठ्ठा मतदारांमध्येही अनेक ठिकाणी फाटाफूट झाली आहे. भाजप नेतृत्वाच्या संपर्काअभावी निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा उठवत नेतृत्व विस्ताराची संधी धनंजय यांच्याकडे चालून आल्याने सर्वच मतदारसंघात धनंजय यांचा प्रभाव निर्माण झालेला असेल असे राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.