जालना – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा पातळीवरील महसूल सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्त जालना दौऱ्यावर आले असता प्रशासकीय यंत्रणेच्या संदर्भातील तक्रारवजा निवेदनांचा त्यांच्यावर पाऊस पडला ! जिल्हाधिकारी कार्यालयात ३८५ निवेदने त्यांना नागरिकांनी दिली. प्रशासकीय कामांच्या संदर्भात तक्रारी करणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहून बावणकुळे यांनीही वार्ताहर बैठकीत आश्चर्य व्यक्त केले.

यासंदर्भात बावण‌कुळे म्हणाले, अनेक नागरिकांच्या लहान तक्रारी आहेत. तलाठी ते विभागीय आयुक्त यांच्या दरम्यान असलेल्या तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात. अनेक गरीब माणसांच्या तक्रारी जिल्ह्यात सुटण्यासारख्या असूनही त्या तशाच राहत असतील तर त्यांनी दाद कुणाकडे मागायची ? आपल्या दौऱ्यात जनतेकडून प्रशासकीय यंत्रणेच्या संदर्भात ३८५ तक्रारी आल्या याचे वाईट वाटते. तालुका आणि जिल्हा पातळीवर लोकन्यायालये आयोजित यासंदर्भातील तक्रारींचा निपटारा केला पाहिजे.

तत्पूर्वी अंबड येथे जिल्हा पातळीवरील महसूल सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात बावणकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची ‘अँग्रीस्टॅक’ नोंद‌णी आवश्यक आहे. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यक्षेत्रात हजर असणे आवश्यक आहे. त्यासाठी केन्द्राच्या धर्तीवर ‘फेसॲप’ च्या माध्यमातून हजेरी घेण्यात येणार आहे.

महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी आणि भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बावणकुळे म्हणाले, महसूल विभाग ही राज्य सरकारची जनतेतील पहिली ओळख असते. हा विभाग विश्वासार्ह असला तर जनतेतील सरकारवरचा विश्वास मजबूत राहील. महसूल विभागाची मराठवाडयातील पदे आकृतीबंधानुसार भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशीमा मित्तल यांनी प्रारंभी जिल्हयातील संबंधित शासकीय योजनांच्या संदर्भात माहिती दिली. जिल्ह्यातील पाचही विधानसभा सदस्य आणि संबंधित जिल्हा पातळीवरील अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते.