जालना : जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपप्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यासाठी ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, या संदर्भात त्यांच्या भेटीगाठी झाल्याची चर्चा आहे.
जालना नगर परिषदेच्या राजकारणातून त्यांचे नेतृत्व पुढे आलेले आहे. यापूर्वी तीन वेळेस त्यांनी जालना विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे. विधानसभेच्या गत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. जालना नगर परिषदेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मागील साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत.
भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गोरंट्याल म्हणाले, ‘कब का टूट चुका था में, अब बिखरना बाकी है.’ भाजप प्रवेशावर थेट उत्तर देण्याऐवजी शाहिरी अंदाजात ते म्हणाले, ‘तुम्हारे हजारों राज से मेरी खामोशीही सही, न जाने कितने राजों पर पर्दा रखती है.’ हे रहस्य कधी उलगडणार, या प्रश्नावर लवकरच तुम्हाला पेढे देऊ, असेही ते म्हणाले. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबत पक्ष प्रवेशाबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याऐवजी ते आपले मित्र आहेत, एवढेच गोरंट्याल म्हणाले.
काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचा उल्लेख करून गोरंट्याल म्हणाले, ‘ते निवडून आल्यामुळे आपली काही कामे होतील, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु त्यांच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे झाली नाहीत. उलट शिवसेनेच्या शिंदे गटाला फायदा झाला. आजच खासदार काळे यांचा फोन आला होता, येऊन भेटतो म्हणाले. आपल्या मनात पक्षाविषयी खदखद असूनही काँग्रेसचे नेते त्या संदर्भात बोलायला तयार नाहीत का, या प्रश्नावर या संदर्भात नंतर बोलू, असे उत्तर गोरंट्याल यांनी दिले.