जालना : जाय‌कवाडी धरणातून तीन लाख क्यूसेसपेक्षा अधिक विसर्ग करण्यात आल्यामुळे जालना जिल्हयातील गोदावरी काठच्या जवळपास ४० गावांतील रहिवाश्यांनी रविवारची रात्र जागूनच काढली.

पाण्याचा विसर्ग वाढण्याच्या सूचनेमुळे जिल्हाधिकारी आमिशा मित्तल यांनी रविवारी सकाळपासूनच या गावांच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणा तयार ठेवली होती. शासनाच्या मदतीसाठी आणि ग्रामस्थांना प्रत्यक्ष सहकार्य करण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपे यांनीही त्यांच्या संस्था आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यंत्रणा उभी केली होती.

टोपे यांचे गाव पाथरवाला हे गोदावरीच्या काठावरच आहे. त्यांच्या अधिपत्याखालील दोन्ही साखर कारखाने आणि अनेक शाळा या भागातच आहेत. त्यामुळे त्यांची यंत्रणा या भागात अगोदरपासूनच आहे. यापूर्वी २००६ मध्ये जायकवाडीमधून जवळपास २ लाख ६० हजार क्यूसेस पाणी गोदावरीत सोडले होते. त्यावेळी या गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थीतीचा अनुभव टोपे यांना होता.

राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले की, जायकवाडी ज‌लाशयातून पाणी सोडण्याची जबाबदारी असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संत यांच्या संपर्कात मी सतत होतो. तीन लाख क्यूसेसपेक्षा अधिक विसर्ग होणार म्हणून उद्‌भवणाऱ्या पूरयस्थितीत आपण काय करु शकतो याचे नियोजन करून रविवारी दुपारी तीन ते सोमवारी पहाटे तीन वाजेपर्यंत आपण प्रत्यक्ष पूरस्थिती असलेल्या गावांतच होतो.

या सर्व गावांत दोन साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मत्स्योदरी शिक्षण संस्थेमुळे आमची यंत्रणा आहे. त्याशिवाय कार्यकर्ते आहेत. रविवारी सकाळपासून कुणाला अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी चौदा-पंधरा जणांची नावे मोबाईल क्रमांकासह या भागातील गावांपर्यन्त पोहोचविली. या भागातील गावांत तातडीने संपर्क साधणे किंवा माहिती पोहोचविण्यासाठी पूर्वीपासून अस्तित्वात असलेली आमची अत्याधुनिक यंत्रणा कामाला आली.

टोपे सांगत होते की, गोदावरी काठावरील आपल्या पाथरवाला गावात सोमवारी पहाटे आपण पोहोचलो आणि गावाजवळच्या गोदावरीवरील बंधाच्यानजिक पोहोच‌लो तेव्हा पाण्याचे रौद्र रुप पहावयास मिळाले. गावात पाणी होते. वीसपेक्षा अधिक गावांत मी प्रत्यक्ष जाऊन आलो. सखल भांगातून रहिवाशी आणि गुरांना सुराक्षित स्थळी हलविताना स्थानिक कार्यकर्ते शासकीय यंत्रणेस मदत करीत होते. आमच्या शाळेच्या सहा बस स्थलांतरासाठी तयार ठेवल्या होत्या. याशिवाय आणि साखर कारखाना परिसरातही स्थलांतरिसाठी व्यवस्था होती. आमच्या संस्थांमध्ये विविध दहा ठिकाणी स्थलांतरीतांची निवास त्याचप्रमाणे चहा, न्याहारी आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. पूरपरिस्थिती उद्‌भवणाऱ्या गावातील कार्यकर्ते रात्रभर आमच्या संपर्कात होते.

तीन लाख क्यूसेसवेक्षा अधिक विसर्ग यापूर्वी जायकवाडीतून कधीच झालेला नव्हता. सखल भागातील रहिवाश्यांना आणि गुरांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम शासकीय यंत्रणा करीत असताना त्यांना अधिकात अधिक सहकार्य करण्याची आमची जबाबदारी होती. यामुळे बारा तास पूरस्थितीच्या गावांना भेटी देऊन मी रात्री तीन वाजता गोदावरीच्या काठावरील पाथरवाला या मूळ गावी मुक्कामास आलो.