राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपाने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून आलं आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय अस्थिरता आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशी दोन्हीकडं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. अलीकडे मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, जनतेची गैरसोय होत आहे. राज्यात लवकरच राजकीय स्थिरता यावी, अशी आमची इच्छा आहे,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
हेही वाचा : “बाप जैसा बेटा, भरलो जल्दी लोटा…” ऑडिओक्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचा चंद्रकांत खैरेंवर निशाणा!
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधीपक्षात कोणतीही अस्थिरता नाही आहे. सत्तारूढ पक्षात अस्थिरता असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. तसेच, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा करणार आहे. दोन-तीन दिवसांत याबद्दल निर्णय घेऊ,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
“निवडणूक आयोगासमोर सुनावणीमुळे…”
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, “धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. म्हणून मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे,” असा दावा बच्चू कडू यांनी केला.