Premium

“शरद पवारांच्या हाताला पकडून बाहेर…”, राष्ट्रवादी कार्यालय वादाबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळत होती. कारण अजित पवार गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी कार्यालयाला लावण्यात आली होती.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापला आहे. विधिमंडळ परिसरात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील शरद पवार गटाचे प्रत्युत्तर असणारे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची लावण्यात आलेली पाटी काही तासातच पुन्हा काढण्यात आली आहे. यावरून वाद पेटलेला असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांच्या हातून त्यांना सगळं खेचायचं आहे. शरद पवारांना ते हुकुमशाह म्हणतात. ते म्हणतात की पवार लोकशाही मानतच नाही आणि मग येऊन म्हणतात की ते आमचे देव आहेत. देवाला बाहेर काढलं जातं असं कधी भारताच्या इतिहासात एकलं आहे का? राष्ट्रवादीच्या कार्यालयाला आम्ही मंदिर मानत होतो आणि त्या मंदिरातील शरद पवार देव होते. त्यांना हात पकडून बाहेर काढण्याचं बोललं जातं, अशा लोकांबाबत काय बोलणार?

हेही वाचा >> एक कार्यालय अन् दोन गट; राष्ट्रवादीतील फुटीचे अधिवेशनात पडसाद

कार्यालयातील नामफलक काढण्यावरूनही आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला केबिनची गरज नाही. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. मी रस्त्यावरही काम करेन. पण हे शरद पवारांचंच नाव काढायला निघाले. त्यांच्या मनाला किती यातना होतील, दुःख होतील याचा विचार न करता. ज्या बाळाला त्यांनी जन्म दिला, ज्या बाळाला त्यांनी वाढवलं, ते बाळ आमचंच आहे हे जे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अजित पवारांवरही टीकास्त्र

“मी दादांविरोधात ३३ वर्षांत एकदाही बोललो नाही. ते २०१९ मध्ये शरद पवरांना सोडून शपथ घेतली तेव्हाही मी काही बोललो नाही. त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली, त्यांना वैयक्तिक टीका करण्याची सवय आहे. त्यांनी आर आर पाटलांना भरसभेत अपमानित केलं होतं. “आर. आर पाटलांना काय फॉरेनला घेऊन जायचं, ते जागोजागी थुंकत असतात”, असं अजित पवार म्हणाले होते. वैयक्तिक टीका करण्याची सवय दादांनी सोडावी, त्यांनी माझं पोट काढलं तर मीही काढणार त्यांचं पोट. तुम्ही माझ्याबद्दल बोलाल तर मीही तुमच्याबद्दल बोलणार नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळत होती. कारण अजित पवार गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी कार्यालयाला लावण्यात आली होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच शरद पवार गटाचे प्रतोद असणारे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची देखील पाटी रात्रीतून लावण्यात आली होती. परंतु, ती पाटीही नंतर काढण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad on ncp office in nagpur vidhimandal targeted to ajit pawar group sgk

First published on: 07-12-2023 at 19:27 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा