राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे बारामती लोकसभेचे मतदान (दि. ७ मे) पार पडल्यानंतर आता राज्यातील उर्वरित मतदारसंघात प्रचारासाठी उतरले आहेत. शिरूर लोकसभेत त्यांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांचा दौरा सुरू आहे. काल शिरूरमध्ये एका सभेत बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. राष्ट्रवादीतून वेगळे होताना जो मुद्दा उपस्थित केला होता, त्याचीच त्यांनी पुन्हा री ओढली. “मी शरद पवारांचा मुलगा असतो तर..”, अशी खंत अजित पवारांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. मी चुलत्याच्या घरी जन्मलो ही माझी चूक झाली का? असेही यापूर्वी ते म्हणाले होते. यातून आपल्या हातात पक्ष दिला नाही, हे अजित पवारांना सुचवायचे असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांनी हा आरोप केल्यांनंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट टाकून अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांनी लिहिले, “राजराजवाडे कधीच संपले. मात्र, अजूनही काही लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही काही जात नाही. रक्ताच्या वारसांनीच सिंहासनावर बसले पाहिजे; तो त्यांचाच हक्क आहे, अशीच मानसिकता अजित पवार यांच्या वाक्यातून दिसून येते. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ, तुमच्यापेक्षा प्रगल्भ नेते २००४ मध्ये आदरणीय शरद पवार यांच्या जवळ होते. त्यामध्ये आर. आर. पाटील, जयंत पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, दत्ता मेघे, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ आदी नेते होते. पण, तुम्ही केवळ रक्ताचे वारसदार आहात, म्हणून तुम्हालाच द्यायला पाहिजे, या भ्रमात तुम्ही का आहात? आणि सरंजामशाहीच्या विरोधातच आदरणीय शरद पवार आहेत. नाही तर त्यांनी उदयनराजेंविरोधात एक साधा माथाडी कामगार शशिकांत शिंदे दिला नसता.”

“साहेबांनी संधी दिली नसती तर दादा म्हशी वळत असते” या वाक्यावर अजित पवारांचं भन्नाट उत्तर, म्हणाले, “अरे..”

बारामतीचे मतदान संपले तरी शरद पवार लक्ष्य

बारामती मतदारसंघात मतदान होईपर्यंत पवार कुटुंबियांमध्ये कलगीतुरा रंगला होता. मात्र आता मतदान झाले तरी अजित पवार गटाकडून शरद पवार यांनाच लक्ष्य करण्यात येत आहे. यावरुनही जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आता निवडणूक संपली. जेवढ्या शिव्या द्यायच्या होत्या. तेवढ्या शिव्या देऊन झाल्या. जेवढ्या गडबडी निवडणुकीत करायच्या होत्या. तेवढ्या करून झाल्या. आता कशाला शरद पवार… शरद पवार करताय? तुम्हाला जेवढे दिले; तेवढे त्यांच्या सख्या मुलीलाही दिलं नाही. केंद्रात मंत्री केले ते सुर्यकांताताई पाटील आणि आगाथा संगमा यांना! मात्र, सुप्रियाताई यांना केंद्रात असे कोणतेही मोक्याचे पद दिले नाही. कारण, शरद पवारांचा संरजामशाहीवर विश्वासच नाही आणि तुमच्या विचारांतून सरंजामशाही जातच नाही.

अजित पवार नेमके काय म्हणाले होते?

“शरद पवार हे आमचे दैवत आहेत, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही”, असे अजित पवार म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad slams ajit pawar over inheritance of sharad pawar claim kvg
First published on: 10-05-2024 at 08:31 IST