महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटप आणि आगामी निवडणुकीच्या एकत्रित प्रचारावर चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला की, आजच्या बैठकीत काय चर्चा झाली. यावर आव्हाड म्हणाले, प्रचार कसा करावा, कोणत्या विषयावर प्रचार करावा, प्रचारादरम्यान कोणत्या विषयांना हात घालावा, आपला प्रचार हा सकारात्मक असायला हवा, त्यात कुठेही नकारात्मकता नसावी अशा सगळ्या विषयांवर साधकबाधक चर्चा झाली.

महाविकास आघाडीत सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवर तिढा कायम असल्याचं सांगितलं जात आहे. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या अर्थी आम्ही सर्व नेते उद्यापासून एकत्र प्रचार कसा करायचा यावर चर्चा करत आहोत याचा अर्थ सगळे तिढे सुटलेत याचे संकेत नाहीत का? आम्ही पुढच्या दीड-दोन महिन्यात प्रचार कसा करावा, प्रचाराचा विषय काय असावा, प्रचाराचे मुद्दे काय असावेत, आमच्या घोषणा काय असाव्यात यावर चर्चा झाली आहे. ‘बस हुई महंगाई की मार, अब क्यों चाहीए मोदी सरकार?’ अशी एक घोषणा तयार करण्यात आली आहे.

यावेळी आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला की, आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीबाबत काही चर्चा झाली का? त्यावर आव्हाड म्हणाले, आम्ही अजूनही प्रकाश आंबेडकरांना म्हणतोय की तुम्ही महाविकास आघाडीत या, तुमचं स्वागत आहे. आपण एकत्र बसून या सगळ्यावर तोडगा काढूया. महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येऊ. तसेच संविधानाविरोधात काम करणाऱ्यांना फायदा होईल असं काही केलं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.

हे ही वाचा >> “शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”

“वंचितच्या पाठित खंजीर खुपसलात’, प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला

मविआचे नेते आणि ठाकरे गटातील खासदार संजय राऊत अजूनही महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा करत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत चाकू खुपसत आहेत असं चित्र दिसतंय. या फोटोसह प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार? तुम्ही म्हणताय की तुमचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत तर मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवत नाही? ६ मार्च रोजी फोर सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का केलं नाही? तुम्ही आजही वंचितला आमंत्रित न करता बैठक बोलावली आहे, आमच्याशिवाय बैठक का करताय? तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय.