पीपल्स रिपल्बिकन पक्ष ( कवाडे गट ) नेते जोगेंद्र कवाडे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. समुद्रातून बाहेर काढल्यानंतर जशी माशाची तडफड होत असते. तशीच, अवस्था सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची झाली आहे, असा हल्लाबोल जोगेंद्र कवाडे यांनी केला. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोगेंद्र कवाडे म्हणाले, “समुद्रातून बाहेर काढल्यानंतर जशी माशाची तडफड होत असते. तशीच अवस्था सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची झाली आहे. ४० आमदार आणि १२ खासदार बाहेर पडणं साधी गोष्ट नाही. खोक्यांनी ही माणसं विकत घेता येतात का? सदन आणि सक्षम लोकांना विकत घेता येत का?”

हेही वाचा : “निवडणुकीवेळी लपून बसतात अन्…”, अमित ठाकरेंचा थेट आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

“अजित पवार सरकारबरोबर आले आहेत. मग, अजित पवारांनी किती खोके घेतले? आता अजित पवारांवर कोणी खोक्यांवरून आरोप करतात का?” असा सवालही जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला.

“एकनाथ शिंदेंशी आमची युती झाली आहे. सध्या आमची सामाजिक कामे झाली आहेत. पण, राजकीय चर्चा अद्याप बाकी आहे. २३ किंवा २४ ऑगस्टला आमची एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक होणार आहे. तेव्हा राजकीय चर्चा केली जाईल. आमच्या पक्षाच्या समितीने विधानसभेच्या ५१ आणि लोकसभेच्या ११ जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे,” असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “…तेव्हा अंबादास दानवेंचा जन्मही झाला नव्हता”, ‘त्या’ टीकेवर बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

यावेळी जोगेंद्र कवाडे यांनी संभाजी भिडे यांच्यावरही टीकास्र सोडलं आहे. “संभाजी भिडे हे महाराष्ट्रात दंगलखोर म्हणून ओळखले जातात. संभाजी भिडेंवर सरकारने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. अन्य कोणी वक्तव्य केली, तर तातडीने कारवाई केली जाते. मग संभाजी भिडेंवर का कारवाई केली जात नाही?” असा थेट प्रश्न जोगेंद्र कवाडे यांनी सरकारला विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jogendra kawade attack uddhav thackeray and mahavikad aghadi over govt ssa